• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमधून विजयी होण्याचा तीनही उमेदवारांचा दावा!

ByEditor

Nov 21, 2024

घन:श्याम कडू
उरण :
उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे मनोहरशेठ भोईर, शेकापचे प्रितम म्हात्रे व भाजपचे महेश बालदी या तीनही उमेदवारांनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.

उरण विधानसभा मतदारसंघात काल मतदान झाले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता निकालाकडे लक्ष लागले आहे. शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी या मतदारसंघात एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी शिवसेना ठाकरे गटाचे मनोहरशेठ भोईर, शेकापचे प्रितम म्हात्रे व भाजपचे महेश बालदी यांच्यातच तिरंगी लढत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत आमदार महेश बालदी हे अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाले होते. यावेळी ते महायुतीकडून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे मनोहरशेठ भोईर व शेकापचे प्रितम म्हात्रे हे मैत्रीपूर्ण लढत देत आहेत. प्रचारसभेत गेले अनेक दिवस आरोप-प्रत्यारोप आदींनी गाजल्या आहेत. उमेदवारांनी प्रचारासाठी आपल्या वरिष्ठ नेत्यांना आणून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. परंतु मतदार किती प्रतिसाद देतात हे महत्वाचे आहे.

भाजपचे महेश बालदी यांनी मागील निवडणुकीत अपक्ष लढवून विजयी झाल्याने तसेच आपण केलेल्या कोट्यावधींच्या विकास कामाच्या आधारे आपणच विजयी होऊ असा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मनोहरशेठ भोईर यांनी आपला मागील निवडणुकीत पराभव होऊनही आपण मतदारसंघाशी संपर्क कायम ठेवून विकास कामे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या समस्या नेहमीच पुढाकार घेऊन वेळप्रसंगी निदर्शने व मोर्चे काढून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला असल्याने विजयाची अधिक संधी असल्याचे सांगितले. तर शेकापचे प्रितम म्हात्रे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून येथील समस्या सुटण्याऐवजी त्यामध्ये अधिक वाढ झालेली दिसते. तसेच येथील आजी माजी लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याने आपण त्या सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू तसेच गेली अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ शेकपचा बालेकिल्ला असल्याने व तरुणांचा वाढता पाठींबा मिळत असल्याने यावेळी आपल्याला विजयाची संधी असल्याचे सांगितले.

उरण विधानसभा मतदारसंघातून तीन ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला असला तरी मतदारांनी कुणाच्या पारड्यात विजयाची मते टाकलीत याचा फैसला येत्या शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तो पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!