IPL Mega Auction 2025 : आयपीएल २०२५ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात होणार आहेत. आजपासून पुढील दोन दिवस आयपीएलचे मेगा ऑक्शन चालणार आहे. सर्व १० फ्रँचायझी पुढील आयपीएल हंगामापूर्वी त्यांचे संघ तयार करतील. या लिलावात काही मोठ्या नावांसह एकूण ५७७ खेळाडूंचा समावेश आहे.
पंतने श्रेयस अय्यरला मागे टाकलं
लखनौने यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला २७ कोटींना खरेदी केले. त्यामुळे पंत आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत, त्याने श्रेयस अय्यरला मागे सोडले आहे, जो थोड्याच वेळापूर्वी २६.७५ कोटी रुपयांना विकला गेला होता. ऋषभ पंतसाठी लखनौ आणि आरसीबी यांच्यात सुरुवातीला युद्ध रंगले होते.
पंत २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता आणि अल्पावधीतच त्याची किंमत १० कोटींच्या पुढे गेली होती. यादरम्यान हैदराबादही शर्यतीत सामील झाले, पण लखनौनेही हार मानली नाही. हैदराबादची मालक काव्या मारन आणि लखनऊचे मालक संजय गोयंका यांनी पंतसाठी लिलावाच्या बोली लावली आणि काही वेळातच त्याची किंमत १७ कोटींच्या पुढे गेली. हैदराबाद आणि लखनौ इथेच थांबले नाहीत आणि पंतवरील बोली वाढतच गेली. लखनौने पंतसाठी २०.७५ कोटी रुपयांची बोली लावली. यानंतर हैदराबादने माघार घेतली.
मात्र, दिल्लीने आरटीएमचा वापर केला. यानंतर लखनौने पंतसाठी २७ कोटींची ऑफर दिली आणि दिल्लीने हात मागे घेतला. अशाप्रकारे पंतला २७ कोटी रुपयांना विकला गेला. लखनऊने त्याला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू म्हणून संघात सामील करून घेतले.
स्टार्क ११.७५ कोटींमध्ये दिल्लीकडे
ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. मात्र त्याला ११.७५ कोटींमध्ये खरेदी केले.
जोस बटलर गुजरातकडे
इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरला गुजरात टायटन्सने विकत घेतले. बटलरची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. गुजरातने त्याला १५.५० कोटी रुपयांना खरेदी केले.
श्रेयस अय्यर २६.७५ कोटींमध्ये पंजाबकडे
KKR ला IPL २०२४ चे विजेतेपद मिळवून देणारा श्रेयस अय्यर IPL इतिहासातील लिलावात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. पंजाबने श्रेयसला २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. श्रेयसची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. श्रेयस अय्यरला मिळविण्यासाठी दिल्ली आणि कोलकाता यांच्यात लढत झाली. या दोघांमध्ये पंजाब किंग्जनेही बोलीत उडी घेतली. यानंतर पंजाब आणि दिल्ली यांच्यात श्रेयस आणि केकेआरला मागे घेण्याची स्पर्धा लागली. श्रेयस लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा भारतीय खेळाडू तसेच आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
अय्यरने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला, ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने २६.७५ कोटी रुपयांना अखेर विकत घेतले.
कागिसो रबाडा गुजरात टायटन्समध्ये
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला गुजरात टायटन्सने विकत घेतले. रबाडाची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. गुजरातने त्याला १०.७५ कोटी रुपयांना खरेदी केले.
पंजाबने अर्शदीपसाठी आरटीएमचा वापर केला
पंजाब किंग्सने राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला १८ कोटी रुपयांना खरेदी केले. सनरायझर्स हैदराबादने अर्शदीपवर १८ कोटींची बोली लावली होती, पण पंजाबने RTM च्या माध्यमातून अर्शदीपला आपल्या संघात खेचले.
पहिली बोली अर्शदीप सिंगवर
IPL २०२५ च्या मेगा लिलावात पहिली बोली अर्शदीप सिंगवर लावली जात आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा मार्की खेळाडूंच्या सेटचा एक भाग आहे. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. अर्शदीपला पंजाब किंग्जने रिलीज केले होते.