प्रतिनिधी
रायगड : जिल्ह्यात सर्पदंश सगळीकडे होत असतात, यामध्ये विंचूदंश हे विशेष असून डॉक्टरांनी सर्पदंश व विंचू दंश झालेल्या रुग्णांना उत्तम सेवा देवून त्यांची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.तसेच सर्प व विंचू दंशाने होणारे मृत्यू शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाट, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा विखे, पद्भूषण डॉ.हिम्मतराव बावस्कर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, रायगड जिल्हा जंगळमय असून समुद्र तटी आहे. त्यातच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे सरपटणारे प्राणी याकाळात बाहेर येवून मानवीवस्तीत येत असतात. त्यामुळे सर्पदंश व विंचूदंशाचे प्रमाण वाढत आहे. याकरिता वेगळया दिशेने संशोधन करणे गरजेचे आहे. शासनाकडून वैद्यकीय सेवेकरिता डॉक्टर घडावेत याकरिता मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात आहे. यासाठी डॉक्टरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग जनसेवेसाठी करावा, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. पावसाळ्यात काम करणाऱ्यांना मजूरांना मोठे गमबूट देण्यात यावेत याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. आपण शिकलो, शासकीय नोकरीत आहोत, आपल्याला जनतेला वैद्यकीय सेवा द्यायची आहे अशी मनभावना प्रत्येक डॉक्टराची असली पाहिजे. डॉक्टरांनी सदैव अद्ययावत, सकारात्मक काम करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी आपल्या मुख्यालयात राहावे, असे निर्देशही त्यांनी कार्यशाळेला उपस्थित असलेल्या डॉक्टरांना दिले. पद्भूषण डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी मोठे पुण्याचे काम केले असून त्यांनी सर्पदंश व विंचू दंशावर केलेल्या औषधांचा वापर संपूर्ण कोकणात केला जात असून याबद्दल जिल्हाधिकारी श्री.जावळे त्यांचे विशेष आभार मानले. अतिजोखमीच्या गरोदर माता यांचे निदान व उपचार करुन त्यांची काळजी घेणे देशासाठी महत्वाचे आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाट म्हणाले की, पद्भूषण डॉ.हिम्मतराव बावस्कर यांनी जिल्ह्यात अनेक प्रकारच्या विंचूदंशावर उपचार करुन नागरिकांना जीवदान दिले असल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना शासनाकडून पद्भूषण ही पदवी देण्यात आली असून ती कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी मुख्यालयात राहून जनसेवा करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. सीएसआर फंडातून एक्सरे मशीन घेण्यात आली असल्यामुळे रुग्णांना एक्सरे काढण्यासाठी इतरत्र जाण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच जिल्हा वार्षिक योजनेमधून आणखी एक एक्सरे मशीन घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शासनाकडून वैद्यकीय सेवेकरिता मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जात असून त्याचे योग्य ते नियोजन झाले पाहिजे. डॉक्टरांनी आपल्या कार्यक्षेत्रात हजर राहून रुग्णांना उत्तम सेवा देवून चांगले काम करावे.
कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. फाळके यांनी मानले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी तसेच डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.