विशेष प्रतिनिधी
रायगड : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत संभाव्य युतीचे संकेत मिळाल्याने सत्ताधारी गटात खळबळ निर्माण झाली आहे. अशातच शिंदे गटाचे एक महत्त्वाचे आमदार पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कर्जत-खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे लवकरच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात सामील होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे कर्जतमधील नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
तीन वर्षांपूर्वी शिंदेंच्या बंडात महेंद्र थोरवे, भरत गोगावले आणि महेंद्र दळवी या कोकणातील आमदारांनी साथ दिली होती. त्यानंतर हे सर्व आमदार शिंदे गटात सक्रिय राहिले. मात्र, सध्या महेंद्र थोरवे पुन्हा ठाकरे गटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.
कर्जत मतदारसंघात सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील राजकीय कटुता नवीन नाही. या पार्श्वभूमीवर घारे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या दोघांमधील राजकीय संघर्ष समोर आला आहे. घारे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आमदार थोरवे सध्या ठाकरे गटाशी जवळीक साधत आहेत. त्यांच्या मतदारसंघात त्यांनी एकत्र काम करण्याचे संकेत दिले आहेत.”
शालेय शिक्षण विभागाने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील सहकार्य पुन्हा जिवंत झाले. 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंनी संयुक्तपणे मुंबईत विजयी मेळावा घेतला. तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एका व्यासपीठावर दिसल्याने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. यामुळे महायुती सरकार, विशेषतः शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे.
या घडामोडींमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक नेते, आमदार आणि स्थानिक पदाधिकारी पक्षांतराच्या तयारीत असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. महेंद्र थोरवे यांच्याबाबतचा दावा खरा ठरला, तर शिंदे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.
