रोहित्रासाठी चांगले स्ट्रक्चर उभारण्याची नागरिकांची मागणी
किरण लाड
नागोठणे : येथील बसस्थानका शेजारी असणारे विद्युत रोहित्र (ट्रान्सफाॅर्मर) हे स्ट्रक्चरसह कलंडलेल्या अवस्थेत असल्याने ते धोकादायक बनले आहे. अशा स्थितीत ते कधीही पडुन एखादी मोठी दुर्घटना घडून नागोठणे शहर पूर्णपणे अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागोठणे बसस्थानका शेजारी असणाऱ्या ट्रान्सफाॅर्मरवरुन बंगलेआळी, बाजारपेठ, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत, काकडे वाडा या परिसरातील घरांना, दुकानांना वीज पुरवठा होतो. यात मुख्यत्वे बाजारपेठ, पोलिस ठाणे, ग्रामपंचायत यांसारखी नागरिकांची वर्दळ असणारी महत्वाची ठिकाणे येत आहेत. या परिसरात नागरिकांना बाजारहाट करण्यासाठी, तसेच सरकारी कामानिमित्त ये जा करावी लागत असते. हा परिसर नागरिकांच्या कामाच्या दृष्टीने महत्वाचा बनला आहे. या परिसरात पावसाळ्यात वारंवार वीज खंडीत होत असते, कारण या ठिकाणी वीजपुरवठा करणारे ट्रान्सफाॅर्मर ज्या स्ट्रक्चरवर तसेच बांधकामावर उभे केलेले आहे त्याची उंची कमी आहे. तसेच ते ट्रान्सफाॅर्मर अंबा नदीपासून जवळ असल्याने पूराचे पाणी येऊन सप्लाय ड्रिस्ट्रीब्युटर पाण्याखाली जाते. हा भाग पूराच्यावेळी पाण्याखाली जात असल्याने महावितरणला पुढील धोका टाळण्यासाठी खबरदारी म्हणून तेथील ट्रान्सफाॅर्मर बंद करावे लागते. त्यामुळे लाईट गेल्यावर वरील महत्वाची ठिकाणे अंधारात बुडून जातात. जोपर्यंत पूर ओसरत नाही तोपर्यंत वरील परिसर दोन, दोन दिवस अंधारात असतो. सहाजिकच लाईट विना नागरिकांची, दुकानदारांची तसेच सरकारी कार्यालयाची कामे ठप्प होतात.

पावसाळ्यात दरवर्षी अंबा नदीला पूर येत असतो. नागोठणे बसस्थानका शेजारी असणारे ट्रान्सफाॅर्मर पूराच्या पाण्याने बुडुन जातो. ट्रान्सफाॅर्मर ज्या स्ट्रक्चरवर उभे आहे ते स्ट्रक्चर, सप्लाय ड्रिस्ट्रीब्युटर सातत्याने पूर ओसरेपर्यंत पाण्यात असल्याने त्याला गंज पकडलेला आहे तसेच स्ट्रक्चरच्या पायाचे बांधकाम नादूरुस्त स्थितीत बनलेले आहे. या सर्व परिस्थितीत ट्रान्सफाॅर्मर स्ट्रक्चरसह कलंडलेल्या स्थितीत असल्याने पडून कधीही मोठी दुर्घटना घडून संपूर्ण नागोठणे शहर अंधारात बुडुन जाऊ शकते. तसेच त्या भागात प्रचंड प्रमाणात जंगली झाडे,झुडपे वाढली असून जनजनावरे वावरण्याची भिती निर्माण झालेली आहे.महावितरणाचे कर्मचारी मेटेंनसचे काम करण्यासाठी ट्रान्सफाॅर्मर स्ट्रक्चरवर चढतात अशावेळी दुर्घटना घडू शकते. वरील परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठीं महावितरणाने वेळीच लक्ष घालून अवघड व कलंडलेल्या स्थितीमध्ये असलेल्या ट्रान्सफाॅर्मर स्ट्रक्चरची पायासकट बांधकाम करुन उंची वाढवून नविन स्वरुपात उभे करावे अशी मागणी जनतेकडून होत आहे.
नागोठणे बस स्थानकाशेजारी असणारे ट्रान्सफाॅर्मर ज्या स्ट्रक्चर वर उभे आहे ते स्ट्रक्चर कलंडलेल्या तसेच धोकादायक स्थितीमध्ये आहे. तसेच अंबा नदी जवळ असल्याने पावसाळ्यात पूर येऊन ट्रान्सफाॅर्मर ड्रिस्ट्रीब्युटर पूराचे पाणी ओसरेपर्यंत पाण्याखाली असते. त्यामुळे ते स्ट्रक्चर गंजलेल्या स्थितीत आहे. याची मी अभियंता म्हणून माहिती घेतलेली आहे. पाऊस गेल्यावर लवकरच त्या भागातील ट्रान्सफाॅर्मरचे स्ट्रक्चर बदलून त्याची उंची वाढवली जाईल व ही समस्या सोडविली जाईल.
– नितीन जोशी,
सहाय्यक अभियंता,
महावितरण कार्यालय, नागोठणे.