प्रतिनिधी
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील चोरी करणाऱ्या युवकास अटक करण्यात दिघी पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी (ता. 24) सायंकाळी या चोराला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हा काही झालं नसल्याच्या रुबाबात सगळीकडे फिरत होता. अजिंक्य सायगावकर असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव असून अद्यापपर्यंत 9 लाखाहुन अधिकची चोरी केली आहे.
बोर्लीपंचतन गावामध्ये काही महिन्यांपासून दिवसा व रात्री बंद दरवाजे तोडून घरफोडी करून त्यातील रोख रक्कम व दागिने चोरी होण्याचे प्रकार सतत घडत होते. पोलीस देखील यामुळे हैराण झाले होते. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोर्लीपंचतन येथे मागील पाच महिन्या पासून बंद घरे व घरातील व्यक्ती कामानिमित्त बाहेर असताना रात्री किंवा एकाबाजूला असणाऱ्या घरात दिवसा दरवाजा तोडून, खिडक्यांचे गज तोडून घरात प्रवेश मौल्यवान दागिने तसेच रोख रक्कम चोरी होण्याच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती. पोलीस देखील चोराचा शोध घेत होते. परंतु काही केल्या उकल होत नव्हती अखेरीस पोलिसांना त्यांच्या गुप्तहेरांकडून लागलेल्या माहितीनुसार बोर्लीपंचतन येथील अजिंक्य उद्देश सायगावकर याला ताब्यात घेतले.
कोणतेही काम न करता ऐशो आराम व मौजमजा लुटणाऱ्या तसेच घरामध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांना सोन्याचे दागिने करून देणे, घर बंधणीसाठी मोठी रक्कम अनामत रक्कम देणे अशा गोष्टी पोलिसांच्या कानावर आल्या त्यानंतर त्यास पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यांनी बोर्ली पंचतन मध्ये झालेल्या चोऱ्या आपणच केल्याची कबुली दिली. यामध्ये काही चोरलेले मोबाईल देखील त्याच्या घरून हस्तगत केले आहेत.
चोरी झालेल्यांची पोलिसांकडे धाव
आतापर्यंत बोर्ली पंचतन मध्ये अंदाजे किमान 10 चोऱ्या झाल्या यातून लाखोंचा माल चोरीस गेला होता यामध्ये दागिने व रोख रक्कमेचा समावेश आहे. चोरास अटक केल्यानंतर बोर्ली पंचतन मध्ये याआधी ज्यांच्या कडे चोऱ्या झालेल्या ग्रामस्थांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली.
चोरीच्या गुन्ह्यांबाबत आमचा अधिक तपास सुरु आहे व चोरीमध्ये सामील असणाऱ्या सर्वांना लवकरच ताब्यात घेऊ.
-हनुमंत शिंदे,
सहा. पोलीस निरीक्षक, दिघी सागरी पोलीस