क्रीडा प्रतिनिधी
रायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत खारघरच्या चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी संघांनी कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी लोधीवली संघावर तीन गडी राखून विजय मिळवला.
काल पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर स्पर्धेचा अंतिम सामना चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर विरूद्ध कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी लोधीवली या दोन संघांमध्ये खेळला गेला. त्यामध्ये नाणेफेक जिंकून कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी संघांनी प्रथम फलंदाजी स्विकारली होती,४० षटकांच्या समाप्ती नंतर सर्व गडी गमावून २२५ धावा फलकावर नोंदवल्या. त्यामध्ये अथर्व खांडेकर यांनी दमदार फलंदाजी करत १०१ चेंडूंचा सामना करत १६ चौकार आणि २ षटकारांच्या साह्याने ११५ धावा काढत शतक झळकावले, त्याला दुसऱ्या बाजूने साईराज जोशी यांनी २३ धावा काढून साथ दिली. चॅम्पियन्स खारघरकडून आर्यन देशमुख व अमेय भोसले यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
प्रतिउत्तर देताना चॅम्पियन्स खारघर संघांनी संयमी फलंदाजी करत डावाला सुरवात केली. सलामीवीर आर्यन देशमुख याने ४९, मधल्या फळीत स्वराज गोवारी यांनी ५२ आणि विजय प्रजापती यांनी ३४ धावांचे संघाला योगदान दिले. कोंढाळकर्स संघाकडून साजन राठोड यांनी २ फलंदाज बाद केले. चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर संघांनी ३६व्या षटकात ७ गडी गमावत २२६ धावांचे लक्ष पूर्ण करत अंतिम सामना जिंकला. संपूर्ण स्पर्धा हि खारघर येथिल बी. पी मैदान, घरत मैदान, साई सुरज मैदान, पनवेल येथील ४० प्लस टेंभोडे मैदान व अंतिम सामना पेणच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर खेळवली गेली. संपुर्ण स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील २४ संघांनी सहभाग घेतला होता तर एकूण ४१ सामने प्रथम साखळी व नंतर बाद फेरीनुसार यशस्वीरित्या पार पडले.
आरडीसीए तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व वयोगटातील निवड चाचणी स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम एका रंगारंग कार्यक्रमांद्वारे करण्यात येणार आहे. अंतिम सामन्यासाठी प्रमूख अतिथी म्हणून आरडीसीएचे खजिनदार प्रशांत ओक, सदस्य कौस्तुभ जोशी, पंच प्रशांत माळी, वरुण म्हात्रे, आदेश नाईक उपस्थित होते. रायगड जिल्हा क्रिकेट अससिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.