उरण तालुक्यातील चिरनेर गावातही स्मार्ट मीटर बसविण्याची हालचाल सुरू
अनंत नारंगीकर
उरण : सरकारने राज्यातील शहरी तसेच गाव परिसरात स्मार्ट मीटर बसविण्याचा ठेका हा दहा वर्षांच्या करारानुसार अदानी ग्रुपला दिला आहे. त्याची सुरुवात काही शहरात, गावामध्ये झाली आहे. नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर अदानी ग्रुपच्या माध्यमातून उरण तालुक्यातील शासकीय कार्यालयात स्मार्ट मीटर बसविण्याची सुरुवात केली जात आहे. तसेच तालुक्यातील चिरनेर गावातही स्मार्ट मीटर बसविण्याची हालचाल सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे शहराप्रमाणे गावा गावातील रहिवाशांच्या विजेवर आता अदानी ग्रुपची नजर पडणार असल्याने जनमानसात तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत.
राज्यातील शहरी, गाव परिसरातील रहिवाशांना सरकारच्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर महावितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात येत असून विद्युत धारक ग्राहकांना महावितरण कंपनीच्या माध्यमातून मीटरचे वितरण करण्यात येत होते. सध्या राज्य सरकारने विद्युत धारक ग्राहकांना बसविण्यात येत असलेल्या विद्युत पुरवठा बिलातील मीटरचा ठेका हा अदानी ग्रुपला दिल्याने अदानी ग्रुपच्या माध्यमातून राज्यातील काही शहरात, गावामध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हे काही अंशी सुरू केले जात असताना नागपूर सारख्या प्रगतशील शहरा बरोबर गावातून अदानी ग्रुपच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला रहिवाशांनी विरोध दर्शविला.
त्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्युत धारक ग्राहकांना बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरचे काम थांबविण्यात आले होते. मात्र, सध्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर अदानी ग्रुपच्या माध्यमातून उरण तालुक्यातील शासकीय कार्यालयात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच चिरनेर गावातही स्मार्ट मीटर बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता रहिवाशांच्या विजेवर अदानी ग्रुपची नजर पडणार असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना उमटू लागल्या आहेत.
राज्य सरकारने महावितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत धारक ग्राहकांना बसविण्यात येत असलेल्या विद्युत मीटरचा ठेका हा अदानी ग्रुपला दिल्याने अदानी ग्रुपच्या माध्यमातून शासकीय कार्यालयात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र सध्या कोणत्याही प्रकारचे स्मार्ट मीटर बसविण्याचे काम गावात सुरू नाही. सदर स्मार्ट मीटर हे जून्या विद्युत मीटरप्रमाणे असून रहिवासी जेवढ्या प्रमाणात विजेचा वापर करतील तेवढ्या युनिटचे बिल जून्याच प्रमाणे आकारण्यात येणार आहे. मात्र जनतेत कोणीतरी गैरसमज पसरविण्याचे काम करत आहे.
-जयदीप रा. नानोटे
उप अभियंता, महावितरण कार्यालय उरण.