अमुलकुमार जैन
रायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील रामदास गोविंद खैरे या 72 वर्षीय वृद्ध इसमास लग्नाचे आमिष दाखवून त्याची हत्या करून लुटणाऱ्या महिला आरोपीस चेंबूर येथून तर तिचा पती हर्षल कचर अंकुश यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ठाणे येथून येथून ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे रामदास गोविंद खैरे (वय-72 वर्षे, रा. कुंदन रेसिडन्सी, आराठी) यांचा फ्लॅट बाहेरून बंद असल्याचे आढळले. आतमध्ये जावुन पाहणी केली असता मयत इसमाचे डोक्यावर व कपाळावर गंभीर जखमा दिसुन आल्या, त्यावरून सदर मयत याची हत्या झाल्याप्रकरणी श्रीवर्धन पोलिस ठाण्यात प्रजोत चरण जाधव (वय 27 वर्षे रा. जांभुळ ता. श्रीवर्धन) यांनी दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. सदर हत्येच्या गुन्ह्याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर श्रीवर्धन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रिकामे यांनी सदरची माहीती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांना दिल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन गुन्हे अन्वेषण विभागाला समांतर तपासाबाबत सुचना दिल्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सदर घटनेची माहीती नियंत्रण कक्षाकडुन प्राप्त करून घेत त्यावरून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे आणि त्यांच्या पथकाने श्रीवर्धन येथे जावून घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनतर सायबर विभागाची मदत घेत तांत्रिक तपास चालु केला. सदर तपासामध्ये संशयित वाटणारे आरोपी कळवा ता. कल्याण, जि. ठाणे येथे व चेंबुर, मुंबई याठिकाणी असल्याचे आढळुन आले. मुंबईत राहणारी आरोपी महीला असल्याने सदर महीला आरोपीताचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक लिंगाप्पा सरगर, महीला पोलीस अंमलदार रेखा म्हात्रे, अस्मिता म्हात्रे पथकासह रवाना करण्यात आले. तर कळवा याठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नरे व पथक रवाना करण्यात आले. सदर दोन्ही पथकांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी हर्षल कचर अंकुश (32, रा.इटवा, कळवा जि. ठाणे) यास छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय कळवा या ठिकाणावरून व महीला आरोपी हिस पोलीस उपनिरीक्षक सरगर व महीला अंमलदार रेखा म्हात्रे, अस्मिता म्हात्रे यांनी चेंबुर येथून ताब्यात घेतली.
सदर दोन्ही आरोपीतांकडे चौकशी केली असता अशी माहीती प्राप्त झाली की, मयत इसम खैरे हे बॅंकेमध्ये नोकरीस होते. त्यांची पहिली पत्नी मयत झाल्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता. दुसरी पत्नी 2021 साली कोविडमध्ये मयत झाली. मुलाचे लग्न झाल्यामुळे निवृत्ती काळात खैरे एकटेच एकाकी श्रीवर्धन येथे राहत होते. मयत यांनी एक मित्राच्या मदतीने कविता नावाचे महीलेशी विवाह करण्याचे ठरविले. परंतु मुंबई फ्लॅट घेवुन देणे, दागिने अशा मागण्या असल्यामुळे ती मागणी पुर्ण करू शकत नसल्याने तिने मयतासोबत विवाह केला नाही. काही दिवसांनी कविता हीने तिची मैत्रिण अटक आरोपी हिला मयताचा मोबाईल नंबर दिला व संपर्क साधण्यास सांगितले. अटक महीला आरोपी हीने मयत रामदास खैरे यांना लुटण्याच्या हेतूने जवळीक साधत लग्नाचे आमिष दाखविले व रामदास खैरे यांच्याबरोबर राहू लागली. काही दिवसात खैरे यांचा विश्वास संपादन केल्यानंतर रोख रक्कम सहित दागिने घेवुन फरार झाली होती. खैरे यांनी आरोपी महीला ही सोबत राहत नसल्याने दिलेले पैसे व दागिने परत करावे यासाठी तगादा लावला होता.
या दरम्यान जून २०२४ मध्ये दुसरा आरोपी हर्षल कचर अंकुश याचे महिला आरोपीने बरोबर विवाह केला होता. महीला आरोपी याने तिचा पती आरोपी हर्षल अंकुश यास मयत खैरे हे ब्लॅकमेल करीत असल्याचे खोटे सांगितले. दोघांनी मिळून त्याला जीवनातून संपविण्याचा निर्णय घेतला. ठरल्यानुसार हर्षल अंकुश हा महीला आरोपी हिला ११ नोव्हेंबर २०२४ रोजी श्रीवर्धन येथे सोडण्यास गेला होता. तेव्हापासून महीला आरोपी ही खैरे यांच्याकडे राहण्यास गेली होती. हर्षल अंकुश याने महीला आरोपीस श्रीवर्धन येथे सोडल्यानंतर तो परत मुंबई येथे आला. त्यानंतर दिनांक 18/11/2024 ते 22/11/2024 असा एका हॉटेलवर जावुन थांबला. मयत इसम रात्री जास्त झोपत नसल्यामुळे अटक आरोपीस घरात घेता येत नव्हते. त्यामुळे त्या दोघांनी मयतास गुंगीचे औषध देवुन झोपविण्याचा व नंतर अटक आरोपीस घरात घेवुन जिवे ठार मारण्याचा प्लॅन केला. त्यानुसार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी रात्री जेवणामध्ये कीटनाशक देऊन बेशुद्ध करून कोणत्यातरी हत्याराने वार करून जखमी केले. उशीने तोंड व नाक दाबून ठार केले. घरातील साफसफाई करून मोबाईल, दागिने व पैसे घेऊन दोघेही पसार झाले. या गुन्ह्यातील आरोपी हर्षल कचर अंकुश याच्यासह महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे अधिक तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक लिंगाप्पा सरगर, पोलीस उपनिरीक्षक रूपेश नरे, पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, सहा. पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील, पोलिस हवालदार प्रतिक सावंत, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे, सचिन शेलार, अक्षय जाधव, विकास खैरनार, रूपेश निगडे, जितेंद्र चव्हाण, अक्षय पाटील, शामराव कराडे, सुदिप पहेलकर, तुषार घरात, पोलिस नाईक सचिन वावेकर, पोलिस शिपाई सागर थळे, महिला पोलीस अंमलदार अस्मिता म्हात्रे, रेखा म्हात्रे, अर्चना पाटील यांनी केली आहे.