आजच्या घडीला उरण परिसरात नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात नवीन टोलेजंग इमारती उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. सदरच्या इमारतींना देण्यात आलेल्या नियमावलीत बांधकाम न होता त्याचे खुलेआमपणे उल्लंघन सुरू आहे. त्यातील काही इमारतींना कोणतीच परवानगी नसल्याचे समजते. याबाबत नगरपालिका अथवा ग्रामपंचायत अधिकारी वर्गाकडे विचारणा अथवा माहितीच्या अधिकारात माहीती मागितली असता दिशाभूल अथवा उडवाउडवीची माहिती दिली जात आहे. उरणमधील अशा अनधिकृत इमारतींचा लवकरच पर्दाफाश होणार आहे. तरी आपल्या आयुष्याची पुंजी लावून नवीन सदनिका अथवा दुकान खरेदी करताना कागदपत्रांची खात्री करूनच खरेदी करा अन्यथा नंतर डोक्याला हात लावण्याची वेळ न येवो! |

घनःश्याम कडू
उरण : उरणमधील कोट्याधीश उत्पन्न असलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत बांधकामांचा सपाटा सुरू आहे. याबाबत लेखी तक्रारी व वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध होऊनही गेंड्याच्या कातडीचे प्रशासन अर्थपूर्ण व्यवहारामुळे कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत. अशीच परिस्थिती तालुक्यातील इतर ग्रामपंचायत व उरण नगरपालिका हद्दीतही सुरू आहे. सिडकोने नुकतीच अनधिकृत बांधकामांची यादी वृत्तपत्रात प्रसिद्ध करून कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामध्ये उरण कामठा हद्दीतील चिंतामणी कॉम्प्लेक्स ए, बी, सी, डी व इ विंग अनधिकृत असून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये राजकीय पटलावरील नेतेमंडळींचा सहभाग असल्याचे समजते.
चाणजे ग्रामपंचायत हद्दीत सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून मेरिटाईम बोर्ड, जिल्हा परिषद, वन विभाग, गुरचरण, सार्वजनिक बांधकाम आदी शासकीय व शेतजमीन जागांवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता टोलेजंग इमारती उभ्या करून त्यांची विक्रीसुद्धा करण्यापर्यंत मजल गेली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात शासकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरताना दिसत आहे. चाणजे ग्रामपंचायत हद्दीत तर अनधिकृत बांधकामांचा रेकॉर्ड ब्रेक होण्यासारखी अनधिकृत बांधकामांचे जाळे उभे राहिले आहे. हे जाळे काही एका दिवसांत उभे राहिलेले नाही त्यासाठी अनेक महिने व वर्षे उभी करण्यास लागली आहेत. मग संबंधित विभागातील ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक, उरण पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी वर्ग फक्त गांधारी सारखी डोळ्यावर झापड ओढून अर्थप्राप्ती नंतर दुर्लक्षित करीत असल्याची चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी सिडकोने तीन ते चार पानी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये नवी मुंबई, उरण व पनवेल परिसरातील अनधिकृत बांधकाम धारकांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नवी मुबंई सिडको संपादीत जागेवर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे करण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यामध्ये तात्पुरत्या व काही पक्क्या बांधकामांचा समावेश आहे. सदर अनधिकृत बांधकामे सिडको महामंडळ कायदेशीर प्रक्रिया अवलंबून निष्कासित करण्यात येणार आहे. त्यामुळं सदर इमारतींमध्ये सदनिका अथवा दुकाने खरेदी करतेवेळी सदर जागेची मालकी हक्काची कागदपत्रे तसेच संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून सदर इमारतीस बांधकाम परवानगी देण्यात आली आहे का? याची खात्री करावी अन्यथा होणार्या कायदेशीर परिणामास सिडको महामंडळ जबाबदार राहणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यामध्ये उरणमधील अनेक अनधिकृत बाधकामांपैकी उरण शहरातील कामठानजीक असलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर 71/2अ, 71/2ब मधील चिंतामणी कॉम्प्लेक्स ए, बी, सी, डी, इ विंग मध्ये तळ मजला अधिक 4 मजले 1966 कलम नुसार उभे करण्यात आले आहेत. यांना रीतसर परवानगी मिळाली नसतानाही मनमानी कारभार करीत बिल्डरने इमारत उभी केली आहेत. याला ग्रामसेवक चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.
अशाच प्रकारे चाणजे ग्रामपंचायत कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर गुप्ता बिल्डरने 1+2 परवानगी घेऊन पाच मजली इमारत उभी केली आहे. तसेच काही नाखवा मंडळींनीही अनधिकृत इमारती उभ्या केल्या आहेत. याची माहिती तत्कालीन ग्रामसेवक भास्कर पालकर असताना कारवाईची मागणी करून माहितीच्या अधिकारात माहिती मागून त्याचे रीतसर पैसे भरूनही आजतागायत माहिती देण्यात आलेली नाही.तसेच चाणजे ग्रामपंचायतमध्ये बदलून येणार्या ग्रामसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी वर्ग यांच्याकडे लेखी तक्रारी करूनही व त्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊनही अर्थप्राप्ती होत असल्याने ते कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे बोलले जाते.
सिडको प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी 10 ते 15 वर्षे वास्तव्य करणार्या अनधिकृत इमारतींवर कारवाई करीत त्यांना बेघर केले आहे. उरणमध्ये ही पालिका व ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात इमारतींचेव जाळे विणले जात आहे. तरी अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये यासाठी इमारतींमध्ये सदनिका उवा दुकान खरेदी करताना कागदपत्रांची खातरजमा करूनच खरेदी करावी अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.