मुंबई : मुंबईत मराठी माणसाचा सातत्याने अपमान होत असल्याचा अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून उघडकीस येत आहे. मराठी माणसाला घर, नोकरी नाकारण्यापर्यंतच्या मराठीत बोल्यावरून देखील टार्गेट केलं जात आहे. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. मुंबईत भाजपाची सत्ता आल्याने यापुढे मारवाडीतच बोलायचं असा दम एका दुकानदाराने महिलेला दिला आहे. ही घटना दक्षिण मुंबईतील गिरगावात परिसरातील खेतवाडी येथे घडली असून या घटनेची तक्रार या महिलेने भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांच्या कडे केली. मात्र, त्यांनी या महिलेशी उद्धटपणे वागून दिली. अखेर मनसे कार्यकर्त्यांनी या दुकानदाराला चांगलाच चोप देत वटणीवर आणले आहे.
काय आहे प्रकार ?
गिरगावातील स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांकडे ही महिला तक्रार घेऊन आली होती. या बाबत मनसे पदाधिकारी म्हणाले, गिरगावातील खेतवाडी येथे काही महिला तक्रारी घेऊन आल्या होत्या. खेतवाडी येथील मारवाडी व्यापाराने मराठी महिलांना मराठीत का बोलल्या म्हणून जाब विचारला तसेच महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आले आहे. त्यामुळे मुंबईत मारवाडीतच बोलायचं आता मुंबईत मराठी चालणार नाही, अशी धमकी दिली.
या महिलेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिला तिच्यावर बेतलेला प्रसंग कथन करतांना दिसत आहे. विमल असे पीडित महिलेचे नाव असून त्या या बाबत माहिती देतांना म्हणाल्या, मी मारवाडी व्यापाऱ्याच्या दुकानात गेले होते. त्याने मला मारवाडीतच बोलायला सांगितलं. मी का मारवाडीत बोलायचे याबाबत जाब विचारला. त्यावर दुकानदराने महिलेला उत्तर देत आता भाजप सरकार आलं असून आता तुम्हाला मारवाडीत बोलावं लागेल. त्यामुळे आता मराठीत बोलायचं नाही. ‘मुंबई ही भाजपची आणि मुंबई मारवाड्यांची असे दुकानदार म्हणाला.
मंगलप्रभात लोढा यांच्याकडे तक्रार केली पण त्यांनी उद्धट वागणूक दिली
ही महिला या प्रकाराची तक्रार आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे घेऊन गेली होती. मात्र, त्यांनी या महिलेला सहकार्य करण्या एवजी आमच्यात वाद लावले जात असल्याचं त्यांनी म्हटलं. यावर मी यांना उत्तर काय द्यायचं ? मी लोढांना आतापर्यंत सहकार्य केलं. आम्ही त्यांना निवडून दिले मात्र, त्यांनी आम्हाला ओळख सुद्धा दिली नाही. तुम्हाला आमची ओळखच हवी का? तुम्ही मलबार हिलचे आमदार आहात ना ? मलबार हिलमधील प्रत्येक नागरिक तुमचाच ना? मग ओळखच पाहिजे का?”, असा सवाल या महिलेने केला आहे. मनसैनिकांनी या दुकानदाराला चोप दिला असून त्याला महिलेची माफी मागायला लावली आहे.
भाषिक द्वेष पसरवणाऱ्या घटनेचा निषेध; मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया
मंगल प्रभात लोढा यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. एक्सवर त्यांनी पोस्ट लिहिली असून यात टयांनी म्हटलं की, “गिरगावातील खेतवाडी परिसरात घडलेल्या भाषिक द्वेष पसरवणाऱ्या घटनेचा निषेध! मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे! त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला!, अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे! भाजपाचे नाव घेऊन, अशे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत! आपली मुंबई सर्वांची आहे!, परंतु ती सर्वात आधी मराठी माणसाची आहे, त्यामुळे असा भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे. जाहीर निषेध!” असे लोढा यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
