मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात. नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती मंत्रीपदे मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी माहिती समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देंवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या तीन नेत्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांचा समावेश न करण्याचे आदेश दिले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
या आदेशामुळे शिवसेनेच्या 3 माजी मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डच्चू मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्री असणारे संजय राठोड, अब्दूल सत्तार आणि तानाजी सावंत यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अब्दूल सत्तार
राज्याचे माजी कृषी मंत्री आणि अल्पसंख्यांक मंत्री अब्दूल सत्तार यांच्या कार्यकाळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले आहे. तसेच या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती देखील नेमण्यात आली आहे.
संजय राठोड
राज्याचे माजी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यावर बंजारा समाजातील एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना नव्या मंत्रिमंडातून डच्चू मिळू शकते.
तानाजी सावंत
अब्दूल सत्तार आणि संजय राठोड यांच्यासोबत माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना देखील मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहे.
