• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

राहुल नार्वेकरांचा पत्ता कट, कालिदास कोळंबकरांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती

ByEditor

Dec 6, 2024

मुंबई : राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज राजभवनात कालिदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कालिदास कोळंबकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामुळे आता राहुल नार्वेकर यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजभवनावर त्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या निलम गोऱ्हे उपस्थितीत होत्या. येत्या 7, 8 आणि 9 डिसेंबर रोजी तीन दिवस मुंबईत विशेष अधिवेशन होणार आहे. या विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येते. ही शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड करणं गरजेचे असते. त्यानुसार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे.

आता 7, 8 आणि 9 डिसेंबर रोजी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशन दरम्यान कालिदास कोळंबकर हे विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. येत्या 7 डिसेंबरला तीन दिवसीय विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सचिवालयाकडून सर्व कर्मचाऱ्यांना तयारीसाठी उपस्थित राहण्याची सूचनाही देण्यात आली आहे. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्षाची निवड होईल.

शपथ घेण्यापूर्वी कालिदास कोळंबकर काय म्हणाले?

मला पक्षाकडून हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार दुपारी १ वाजता मी राजभवनात जाऊन हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहे. यानंतर पुढे मला विधानसभा अध्यक्ष म्हणून कायम ठेवायचे की नाही, याबद्दल पक्ष निर्णय घेईल. पण मी माझी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलून दाखवली आहे, असं कालिदास कोळंबकर यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!