• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावात दोन कारमध्ये अपघात; ८ प्रवासी जखमी

ByEditor

Dec 7, 2024

सलीम शेख
माणगाव :
मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासचे काम रखडल्याने माणगावकर नागरिक तसेच कोकणातील प्रवासी यांना भयावह अपघाताची दृष्य नेहमीच पहायला मिळत आहेत. असाच एक भयावह अपघात ६ डिसेंबरच्या रात्री ११:१५ ते ११:३० च्या दरम्यान माणगाव बाजारपेठेलगत एकता पेट्रोल पंपाच्या अलीकडे व मोतीराम प्लाझाच्या समोरील वळणावर घडला. हा अपघात एक्सएल सिक्स कार व वॅगनर कार यांच्यामध्ये घडला आहे. अपघाताची भयावहता इतकी होती की यामध्ये दोन्ही कारचा अक्षरशः चुराडा झाला. यामध्ये गुहागरवरून मुंबईकडे जाणारी वॅगनर कार क्र. एमएच ०१ सीआर ३५५३ व मुंबई बाजूकडून खेडकडे जाणारी मारूती नेक्सा गाडी एक्सएल सिक्स क्र. एमएच ०८ एएक्स ६०६८ या गाड्यांमध्ये हा अपघात घडला.

दोन्ही गाड्यांमध्ये चालकासहित ४-४ असे एकूण ८ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये मुंबईकडून खेडकडे जाणाऱ्या एक्सएल सिक्स कारमध्ये चालक निलेश जोगळे, प्रवासी महिला अनिता गिल्डा, स्मिता बुटाला, वर्षा चिंडक (सर्व रा. खेड जि. रत्नागिरी) तर गुहागरकडून मुंबईकडे जाणारी वॅगनर कारमधील कुटुंब चालक विकास भागवत, ज्योती भागवत, ऋग्वेद भागवत, चार्वी भागवत (सर्व रा. गुहागर व सध्या रा. मुंबई) अश्या ८ जणांचा समावेश आहे. या अपघातात ८ जण जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले. वॅगनर कारमधील २ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

अपघाताची घटना समजताच माणगाव शहरातील युवक रामनवमी उत्सव कमिटी सदस्य तसेच माणगाव तालुका शिवजयंती उत्सव कमिटीचे सभासद तसेच माणगाव पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. शि. भारत वामन, पो. शि. पिंपळे, यश गालिंदे व गृहरक्षक जवान हजर राहिले व अपघातातील अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघाताची भयानकता अतिशय गंभीर होती आणि विशेष म्हणजे या अपघातात २ चिमूकले आणि ३ वयोवृद्ध महिलांचा समावेश होता. सदर अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!