क्रीडा प्रतिनीधी
रायगड : रायगड जिल्हा हा संपुर्ण विश्वात टेनिस बॉल क्रिकेटसाठी खूप प्रसिद्ध आहे. रायगड जिल्ह्यात असणाऱ्या एकूण १५ तालुक्यात जवळपास प्रत्येक गावात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षी एका सर्वेनुसार रायगड जिल्ह्यात लहान मोठ्या जवळपास २००० टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. करोडो रुपयांची उलाढाल ह्या टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातुन जिल्ह्यात दरवर्षी होत असते. अगदी गावपातळी ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू, पंच, स्कोअरर, समालोचक, क्रिकेटचे साहित्य, कपडे, स्टेज डेकोरेशन, लाईटस्, साऊंड, प्रसार माध्यम इत्यादी अनेकांचे उदरनिर्वाह टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातुन होताना दिसते.
ह्याच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रायगड जिल्ह्यासह परदेशात सुद्धा नावलौकिक असलेला पनवेल तालुक्यातील वहाळ गावचा सुपरस्टार खेळाडू ऋषिकेश कुमार नाईक यांनी खारघर येथे झालेल्या रायगड प्रीमिअर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या वेळी आपली निवृत्ती जाहीर केली. ३७ वर्षीय ऋषी नाईक हा सिव्हिल इंजिनिअर उच्चशिक्षित खेळाडू असून सिडकोमध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहे. आपल्या तडाखेबंद फलंदाजीमुळे सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या ऋषी नाईक यांनी आतापर्यंत अनेक स्पर्धेत सामनावीर, उत्कृष्ठ फलंदाज व मलिकावीराचे किताब पन्नासपेक्षा जास्तवेळा पटकावले आहेत. त्याच्या नावावर आतापर्यंत ४ दुचाकी बाईक्स मालिकावीराचे पारितोषिक सुद्धा आहेत. आपल्या वहाळ गावच्या व व्यावसायिक संघासाठी त्यांनी २२ वर्ष योगदान दिले आहे. सिडको कं. साठी टाइम्स शिल्ड, कांगा लिग सारख्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा सुधा तो खेळत आहे.
जिल्हयातील व्यावसायिक संघ रायगड इलेव्हन, हरिओम पनवेल, जय अंबिका तोंडारे, वीबीपी पनवेल, आदर्श न्यू पनवेल, किंजल स्पोर्टस, रॉयल्स कळंबोली संघांसाठी त्यांनी योगदान दिले आहे. एक खेळाडूवृत्तीचा हरहुन्नरी गुणवंत खेळाडू म्हणून ऋषी नाईक यांची ख्याती रायगड जिल्ह्यात आहे. निवृत्ती जाहीर केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ऋषी नाईक खूप भावुक झाले. त्यांनी सर्व सहखेळाडू, प्रेक्षक, हितचिंतकांनी दिलेल्या आजवरच्या प्रेमाबद्दल आभार मानले. ह्या पुढे आपण फक्त व्यवसायिक लेदर बॉल क्रिकेट खेळणार असून आपले योगदान रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या युवा व होतकरू खेळाडूंसाठी देणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.