नागोठणे पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा
अमूलकुमार जैन
अलिबाग : पेण तालुक्यातील दादर व चोळे येथे १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर धावजी ठाकूर यास प्रमुख जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. राजदेकर यांनी दिनांक २४/०७/२०२२ रोजी महत्वपुर्ण निकाल देत वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
सदरचा गुन्हा हा दि. २१/०४/२०२१ रोजी १२ वाजल्यापासून दिनांक ०६/०५/२०२१ रोजी २:३० वा.चे दरम्यान पेण तालुक्यातील मौजे चोळे, तसेच मौजे दादर याठिकाणी पडला असून या प्रकरणातील पिडीत मुलगी हि अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील तिला फिर्यादी यांचे संमतीशिवाय फुस लावून दि. २१/०४/२०२१ रोजी प्रथम चोळे गावचे खाडी किनारी असलेल्या शेतामध्ये नेवून तेथे पिडीत मुलीचे गळ्यात मंगळसूत्र घालून आता आपण नवरा बायको झालो असे सांगून तिच्यासोबत शारिरीक संबंध केले व त्यानंतर दि. ०५/०५/२०२१ रोजी त्याच्याकडे असलेल्या अॅक्टीवा मोटारसायकलवरुन आपले मुळ गावी दादर येथे घेवून जावून दादर फाट्यावर रोडचे बाजूस बंद असलेल्या चायनिज दुकानात नेवून तेथे देखील तिचे अल्पवयीनपणाचा फायदा घेवून तिच्याशी पुन्हा शारिरीक संबंध ठेवून तिचेवर लैंगिक अत्याचार केले.
यावर पिडीत मुलीची काकी दिपा प्रितम पाटील यांनी नागोठणे पोलीस स्टेशनमध्ये आरोपी याच्याविरुध्द तक्रार नोंदविली असता, या प्रकरणी सदर केसचा सहा. पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलदगतीने तपास पूर्ण करून मोलाचे सहकार्य केले. सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता स्मिता राजाराम धुमाळ-पाटील यांनी एकूण ८ महत्वाचे साक्षीदार तपासले व कोर्टासमोर स्मिता धुमाळ विशेष सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद महत्वपूर्ण ठरला. यातील साक्षीदार व वैद्यकिय अधिकारी विजय सावनकर तसेच तापसिक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच पोलीस हवालदार सचिन खैरनार, पैरवी कर्मचारी महिला पोलीस शिपाई प्रियंका नागावकर यांचे सहकार्य मोलाचे ठरले.
सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता स्मिता राजाराम धुमाळ पाटील यांनी सरकारपक्षातर्फे कोर्टासमोर केलेला युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला. सदर खटल्यात आरोपी ज्ञानेश्वर धावजी ठाकूर यांच्यावर भादवि सं. कलम ३६३, ३७६, ३७६ (२) (आय) (एन) तसेच पोक्सो कायदा कलम ३ सह ४ व ५ सह ६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल होता. आरोपी ज्ञानेश्वर धावजी ठाकूर याला भा.द.वि. कलम ३७६ (२) (आय) (एन) व पोक्सो कायदा २०१२ नुसार कलम ०४ व ०६ प्रमाणे मा. न्यायालयाने दोषी धरून दोन्ही गुन्ह्यांकरिता एकत्रित २० वर्षांची शिक्षा व रु. १०,०००/- रकमेचा दंड व भा.द.वि. कलम ३६३ प्रमाणे १ वर्षांची शिक्षा व रु. ५,०००/- रकमेचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.