कर्जत तालुक्यातील बोपेले येथील घटना
अमुलकुमार जैन
रायगड : कर्जत तालुक्यातील बोपेले येथे पत्नीने खर्चासाठी पाचशे रुपये दिले नाही म्हणून पती शशांक शाम गायकर (वय ४४, रा. फ्लॅट नं. २०५ एनकारीष सोसायटी, बोपरे, तालुका-कर्जत, जि. रायगड) याने आत्महत्या केली असल्याबाबतची फिर्याद पत्नी युगंधरा शशांक गायकर यांनी नेरळ पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील मौजे बोपेले येथील मयत शशांक शाम गायकर हा काही कामधंदा करीत नव्हता. त्याला खर्चासाठी लागणारे पैसे मयत यांच्या पत्नी युगंधरा शशांक गायकर या देत होत्या. दिनांक १८/१२/२०१४ रोजी १२.३५ वा. सुमारास यांतील मयत याने पत्नी युगंधरा गायकर यांच्याकडे मोबाइलद्वारे व्हॉटसअप करून खर्चासाठी पाचशे रुपये मागितले. मात्र पत्नी युगंधरा हीने मयत शशांक याने पाठविलेल्या व्हॉटसअप मेसेजला कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच मयत शशांक हा वारंवार फोन करत असल्याने त्याचा नंबर ब्लॉक करून ठेवला, तसेच त्यांनी मागणी केलेले पाचशे रुपये देखील ऑनलाईन पाठवले नाही. याचा राग आल्याने मयत याने राहत्या घरी 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी साडेतीन ते रात्री नऊच्या दरम्यान सीलिंग फॅनला गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.
याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाुसार पोलिस हवालदार लोखंडे करीत आहेत.