क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या २३ वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोह्याच्या दिशा क्रिकेट अकॅडमी संघाने स्पर्धेत अंतिम विजयी होण्याचा मान मिळवला आहे. बुधवार दिनांक २५ डिसेंबर रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात दिशा क्रिकेट अकॅडमी संघाने न्यू पनवेल क्रिकेट अकॅडमी संघावर ४ गडी राखून विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या न्यू पनवेल क्रिकेट अकॅडमी संघाने ३६.५ षटकांमध्ये सर्व गडी गमावत १५९ धावा काढल्या. त्यामध्ये क्रिश शेट्ये यांनी सर्वाधिक ३९ धावा, साहील देसाई २४, प्रथमेश राणे यांनी १९ धावांचे योगदान दिले. दिशा क्रिकेट अकॅडमीकडून साहिल लहाने यांनी ४, आदित्य साळवे ३ रितेश नलावडे यांनी २ फलंदाज बाद केले. १६० धावांचे लक्ष्य दिशा क्रिकेट अकॅडमी रोहा संघाने ६ गडी गमावत ३०व्या षटकात पूर्ण केले. सलामवीर आर्यन देशमुख २८, आयुष माळी २५, मधल्या फळीत श्रेयस कुमार २५ व मिहिर भाटकर यांनी २५ धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. न्यू पनवेल संघाकडून मिलन चौरसिया यांनी भेदक गोलंदाजी करत ४ फलंदाज तंबूत धाडून सामन्याला रंगात आणली. त्याला दुसऱ्या बाजूने हर्ष सिंह व आदित्य ढवळे यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून साथ दिली.
अंतिम सामन्यासाठी प्रमूख अतिथी म्हणून आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, पेण स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण शिंदे, सदस्य ॲड. पंकज पंडित, प्रशिक्षक कमिटीचे अध्यक्ष शंकर दळवी, रोहा संघाचे प्रशिक्षक सुरेंद्र भातिकरे, न्यू पनवेल संघाचे प्रशिक्षक सुरेश म्हात्रे, राजेश शिंदे, पंच सुयोग चौधरी, रोहन पाटील, आदेश नाईक यांच्यासह दोन्ही संघाचे खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.