• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणची अवस्था ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी!

ByEditor

Dec 27, 2024

गोदाम व्यवस्थापकांनी उघड्यावर मांडला जीवनावश्यक वस्तूंचा बाजार; प्रशासनाचे दुर्लक्ष

अनंत नारंगीकर
उरण :
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उरण तालुक्यात बेकायदा अनाधिकृत गोदामांनी आपलं बस्तान बसविलेलं आहे. अशा गोदामांवर कारवाई करण्यासाठी सिडको, नैना प्राधिकरण, तहसील कार्यालय उरण, वन विभाग, खारलँड, कस्टम, पंचायत समिती उरण, स्थानिक ग्रामपंचायत पुढाकार घेत नसल्याने आज गोदामात साठवून ठेवलेल्या जीवनावश्यक वस्तू या गोदाम व्यवस्थापकांनी उघड्यावर ठेऊन आपला गोरख धंदा सुरू केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे उरणची अवस्था ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशीच झाली आहे.

जेएनपीए बंदरातून मोठ्या प्रमाणात देश परदेशात मालाची आयात निर्यात होत असल्याने परप्रांतीय फेरीवाल्यांनी, व्यावसायिकांनी स्थानिक पुढाऱ्यांना, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांना हाताशी धरून खाजगी तसेच सिडको, वन जमिनी बरोबरच खाडी किनाऱ्यावरील जमिनीवर दगड मातीचा भराव टाकून गोदामाची उभारणी केली आहे. अशा बेकायदेशीर उभ्या राहिलेल्या गोदामावर कारवाई करण्यासाठी सिडको, नैना प्राधिकरण, तहसील कार्यालय उरण, वन विभाग, खारलँड, कस्टम व संबंधित प्रशासन आपली पावले उचलत नसल्याने सदर गोदाम मालकांनी, व्यवस्थापकांनी जीवनावश्यक वस्तूंबरोबर ज्वलंतशील पदार्थांचा साठा आपआपल्या गोदामात करण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे.

काही गोदाम व्यवस्थापकांनी जीवनावश्यक वस्तूंचा बाजार हा उघड्यावर मांडून त्या मालाची आयात-निर्यात करण्याचा निर्धार केल्याचे चित्रच समोर येत आहे. तरी उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांनी उरणचा प्रथम नागरिक म्हणून या परिसरातील अनाधिकृत गोदामांची तपासणी करून कारवाई करावी, नाहीतर हेच गोदाम व्यवसायिक पैशाच्या लालसेपोटी देशाच्या सुरक्षेला बाधा आणून आरडीएक्स, हत्यारे ठेवण्यास मागेपुढे पाहणार नाहीत अशी भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!