• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कॅम्पोलियन क्लब टी-२० क्रिकेट स्पर्धेत अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघाचा दणदणीत विजय

ByEditor

Dec 29, 2024

क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग :
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पोलियन क्लब (थ्री स्टार हॉटेल ऍण्ड रिसॉर्ट खोपोली, आरडीसीए सदस्य समीर मसुरकर पुरस्कृत) टी-२० जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघाने पेण स्पोर्ट्स असोसिएशन संघावर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. प्रथम फलंदाजी करताना पेण स्पोर्ट्स असो. संघाने २० षटकांत ५ गडी गमावत १५३ धावसंख्या उभारली. सुरवातीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर मधल्या फळीत रवी सोलंकी यांनी धुवांधार अर्धशतक झळकावत ५७ तर दुसऱ्या बाजूने समीर आवस्कर यांनी ५३ धावा काढून संघाची धावसंख्या १५३ पर्यंत पोचवली. अलिबाग संघाकडून अभिषेक नाईक २, रितेश तिवारी, मिहिर भाटकर यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

१५४ धावसंख्येचा पाठलाग करताना अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघाने संयमी फलंदाजी करत सलामीवीर अभिजीत रोहांदिया ३९ व मिहिर भाटकर यांनी ३२ धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत अलिबागचा युवा तंत्रशुद्ध फलंदाज हृषिकेश राऊत याने चौफेर फटकेबाजी करत नाबाद ४५ धावा ठोकल्या. त्याला चैतन्य पाटील याने दुसऱ्या बाजूने नाबाद १२ धावांची खेळी करत साथ दिली. अलिबाग संघाने सामना शेवटच्या षटकात ६ गडी राखून जिंकला. पेण स्पोर्ट्सकडून सिध्दार्थ म्हात्रे याने २ तर तुषार म्हात्रे याने एक गडी बाद केला.

अंतिम सामन्यासाठी प्रमूख अतिथी म्हणून रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश पाटील, सदस्य ॲड. पंकज पंडित, मुख्य प्रशिक्षक शंकर दळवी, रायगडचे माजी कर्णधार रविंद्र तांडेल, सिलेक्टर उदय गद्रे, माणूसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, पंच चंद्रकांत म्हात्रे, सुयोग चौधरी, आदेश नाईक, सुनील सरगर यांच्यासह दोन्ही संघाचे खेळाडू, क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!