प्रतिनिधी
उरण : टी. एम. जी. क्रिएशन आणि एनोवेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांच्या सयुंक्त विद्यमाने “ललकारी सन्मानाची” अनुभूती महागौरव संमेलनाचे आयोजन रविवारी (ता. २९) मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई येथे करण्यात आले होते. यावेळी राज्यभरातील समाजसेवी संस्था तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. स्मृतीचषक, सन्मानपत्र, पदक (मेडल) असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी रायगड जिल्ह्यातील उरण सामाजिक संस्थेच्या कार्याचा गौरव करत पुरस्कार प्रदान करण्यात आला. उरण सामाजिक संस्थेकडून संतोष पवार, काशिनाथ गायकवाड, प्रा. राजेंद्र मढवी, रुपेश पाटील, वैभव पाटील यांनी कर्नल रविंद्र त्रिपाठी, ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, अभिनेता अभंष कुमार यांच्या हस्ते हा बहुमोल पुरस्कार स्वीकारला.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मुंबई येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी निवृत्त कर्नल रवींद्र त्रिपाठी, ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, बॉलिवूड अभिनेते अभंष कुमार, स्त्रीरोग तज्ञ डॉ. शुभदा नील, अल्ताफ शेख प्रमुख अतिथी होते. या सर्वांच्या हस्ते पुरस्कर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पुरस्कार देताना आयोजकांनी उरण सामाजिक संस्थेची उपस्थितांना ओळख सांगत संस्थेच्या आरोग्य, शिक्षण, पर्यावरण क्षेत्रातील आजवरच्या कार्याचा गौरव केला. रस्ते, ट्रॉमा केअर हॉस्पिटल, १०० बेडचे हॉस्पिटल अशा पायाभूत सुविंधांसाठी केलेली जनआंदोलने, त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि या सगळ्यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहीत याचिका आदींची माहिती दिली. पुरस्कार सोहळ्याचे आयोजक एन डी खान म्हणाले की उरणकर जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत केलेलं निःस्पृह काम हे उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदत तसेच गंभीर आजारातील रूग्णांना सर्वतोपरी सहकार्य – मार्गदर्शन, कोवीड महामारीमध्ये संस्थेने दिलेले भरीव योगदान, तहायात शेतकरी दाखला, रस्ते अपघातावरील नियंत्रण, पर्यावरणाच्या दृष्टीने द्रोणागिरी पर्वत सरंक्षण मोहीम, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपणाचे उपक्रम आदी कामांबरोबरच प्रा. मढवी सरांच्या अथक परिश्रमाने रायगड जिल्ह्यातील सुमारे ३२००० आदिवासी कुटुंबांना शासकीय दाखले मिळवून देण्यात केलेले उल्लेखनीय काम हे पुरस्काराला उंची निर्माण करणारे आहे आणि अशा संस्थेच्या कार्याचा सन्मान करताना आम्हाला नितांत आनंद होत असल्याची भावना एन. डी. खान यांनी व्यक्त केली.
यावेळी उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी संस्थेचे अध्यक्ष शेतकरी नेते सुधाकर पाटील यांच्या कार्याचा गौरव करत हा सन्मान संस्थेच्या कार्यकर्त्यांचा असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी संस्थेच्या वतीने पुरस्कार घेण्यासाठी आलेल्या प्रा. राजेंद्र मढवी, काशिनाथ गायकवाड, रुपेश पाटील, वैभव पाटील आदींच्या कामाची माहिती संतोष पवार यांनी या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांना करून दिली.