सलीम शेख
माणगाव : येथील जेष्ठ पत्रकार तथा तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष मजिद इस्माईल हाजिते यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्व. माजी आ. मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, भाई जगताप मित्रमंडळ रायगड, ॲड. उमेश ठाकूर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण दि. ३ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता मु. सातिर्जे,ता. अलिबाग या ठिकाणी होणाऱ्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमात करण्यात येणार असून त्या संदर्भातील अभिनंदनपर निवडपत्र पत्रकार मजिद हाजिते यांना निवड समितीचे अध्यक्ष श्रेयश घरत, उपाध्यक्ष आकाश घरत, आकाश राणे, सूत्रसंचालक धनंजय भगत, सल्लागार मंगेश भोणे, चिटणीस स्वप्निल भोईर यांनी आपल्या सहीनिशी दिले आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४व्या जयंतीनिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय, सांस्कृतिक तसेच पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी माजी आ. मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, भाई जगताप मित्रमंडळ रायगड, ॲड. उमेश ठाकूर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. तसेच या कार्यक्रमात ॲड. उमेश ठाकूर यांचा वाढदिवस जल्लोषात दरवर्षी साजरा केला जातो. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे हे पंधरावे वर्षे आहे.
माणगाव येथील ज्येष्ठ पत्रकार मजिद हाजिते हे गेली ३२ वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी रायगड जिल्ह्यातील तसेच माणगाव तालुक्यातील विविध प्रश्न, समस्या यांवर आवाज उठून आपल्या लेखणीने अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत. तसेच शासनाचे महात्मा गांधी व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात वस्तुनिष्ठ व प्रबोधनपर लिखाण करून शासनाच्या या लोकाभिमुख अभियानाबाबत जनजागृती केली. या अभियानात उत्तमप्रकारे लिखाण केल्याने त्यांना कोकण विभागस्तर व जिल्हास्तरावर पुरस्कार देऊन शासनाने त्यांचा यथोचित गौरव केला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना रायगड जिल्हा परिषदेतर्फे रायगड भूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्य करीत असताना रक्तदान शिबीर, विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार, दरवर्षी पत्रकार दिनाचे औचित्य साधून माणगाव उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पत्रकार संघातर्फे औषध व रुग्णांना फळ वाटप या कार्यात अग्रेसर होऊन काम करीत असतात. त्यांच्या या समाजसेवी कार्याची दखल स्व. माजी आ. मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, भाई जगताप मित्रमंडळ रायगड, ॲड. उमेश ठाकूर मित्रमंडळ यांनी घेऊन त्यांची राज्यस्तरीय कुलाबा जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.