फेरफार नोंद मंजूर करून उतारा देण्यासाठी केली होती लाचेची मागणी
अमूलकुमार जैन
अलिबाग : रोहा तालुक्यातील सजा भालगाव येथील लाचखोर तलाठी संतोष मनोहर चांदोरकर (वय 43 वर्षे, तलाठी, सजा भालगांव, अति कार्य. सजा – वाली, तालुका रोहा, रायगड *वर्ग 3 रा. बेंड्रा काॅम्पलेक्स, सी/202, बायपास रोड, तालुका रोहा, रायगड) यास लाच स्वीकारण्याच्या तयारीत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पथकाने कारवाई केली आहे.
लाचखोर तलाठी संतोष मनोहर चांदोरकर यांनी तक्रारदार यांना गट क्रमांक 783 क्षेत्र 01-99-00 या जमिनीचे फेरफार नोंद मंजूर होऊन उतारा देण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे दिनांक 30/05/2023 रोजी 10,000/- रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून आज दिनांक 26/07/2023 रोजी रोहा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस निरिक्षक रणजीत गलांडे, सहाय्यक फौजदार अरुण करकरे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, जितेंद्र पाटील, कौस्तुभ मगर, विवेक खंडागळे, पोलीस नाईक सचिन आटपाडकर, महिला पोलीस नाईक स्वप्नाली पाटील यांनी केली आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी दुरध्वनी क्रमांक ०२१४१- २२२३३१ वर संपर्क साधाण्याचे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांनी केले आहे