अनंत नारंगीकर
उरण : उरण वाहतूक शाखेने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याचे उद्देशाने तसेच वाहन अपघातांना आळा घालण्यासाठी माहे जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत मोटर वाहन कायद्याखाली एकूण ४५४६८ वाहन चालकांविरुद्ध विविध कलमाखाली दंडात्मक कारवाई केली आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित वाहन चालकांना एकूण ३,८०,८५,९५०/- इतक्या रकमेचा दंड आकारण्यात आला असून सदर दंडापैकी एकूण रु. २७,११,६००/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. सदर कारवाई अंतर्गत रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी वाहने पार्क करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर २०,८१३ कारवाई करण्यात आली. विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध ४७४१, वाहन चालविताना सीट बेल्ट न वापरलेल्या वाहन चालकांविरुद्ध १२,३१९ कारवाई करण्यात आल्या तसेच ड्रंक अँड ड्राईव्हच्या वाहन चालकाविरुद्ध १३२ दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तसेच पोलीस रेजिंग डे व रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने उरण वाहतूक शाखेच्या वतीने संपूर्ण उरण शहर व द्रोणागिरी, नवघर, भेंडखळ परिसरात प्रबोधनपर कार्यक्रम व विशेष नाकाबंदी व तपासणी मोहीम आखण्यात आली असून कोणत्याही वाहनचालकाने मद्यप्राशन करून वाहन चालू नये व मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळून आल्यास संबंधित वाहन चालकाविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई सोबतच त्यांचे वाहन जप्ती अथवा वाहन परवाना निलंबन कारवाई करण्यात येईल असा इशारा देऊन, उरण शहर परिसरातील वाहन चालकांनी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहने चालवताना स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मोटर वाहन कायद्याचे पालन करावे असे आवाहन उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी केले आहे.