• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठण्यात राजकीय भूकंप होणार? अनेक कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत

ByEditor

Jan 7, 2025

विशेष प्रतिनिधी
नागोठणे :
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील अनेक महत्वाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपात प्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपातील इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी आता दुसऱ्या पक्षाची वाट धरायला सुरूवात केलीय. राज्यातील अनेक स्थानिक नेत्यांनी आता ठाकरेंची साथ सोडत शिवसेना, भाजपात प्रवेश केलाय. नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे, साक्री, परभणी इथल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तर पुण्यातील सहा माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत या पदाधिकाऱ्यांनी हातातली ठाकरेंची मशाल बाजूला ठेवत इतर पक्षात पक्षप्रवेश केलाय. दरम्यान, नागोठण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरे गटाला शेवटचा जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

नागोठणे ग्रामपंचायतीवर मागील अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता असून पक्षातील फुटीनंतरही येथील कार्यकर्ते ठाकरेंसोबत निष्ठावान राहिल्याचे पाहायला मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत काही वेगळेच चित्र येथे पाहावयास मिळाले. शिवसेना ठाकरे गटाचा अधिकृत उमेदवार असतानाही काही कार्यकर्ते भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसले तर काही शेकापच्या उमेदवाराचा प्रचार करीत होते. त्यातच विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. शिंदेंच्या शिवसेनेचे ३, भाजपाचे ३ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा १ आमदार निवडून आला आहे. त्यामुळे विकासकामांकरिता निधी कुठून आणायचा हा मोठा प्रश्न ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांपुढे उभा राहिला आहे. आपल्या गावात, विभागात भविष्यात विकासकामाकरिता निधी आणायचा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नसल्याने नागोठण्यातील ठाकरे गटाचे निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने ठाकरेंची साथ सोडत महायुतीत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या दोन, तीन बैठकासुद्धा झाल्या असून, आपल्यासोबत किती कार्यकर्ते प्रवेश करणार याची चाचपणी सुरु असून विभागातील कार्यकर्त्यांची एक मिटिंग घेऊन आपली भूमिका येथील स्थानिक पदाधिकारी स्पष्ट करणार असल्याची माहिती शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानेच नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिली आहे. आगामी जिल्हापरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नागोठण्यात राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. मात्र ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार कि भाजपात प्रवेश करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!