सहलीतून मुलांना करून दिली ऐतिहासिक व वैज्ञानिक जाणीव
विनायक पाटील
पेण : चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया, पुणे ही एक सामाजिक संस्था असून ती गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी व त्यांच्या विकासासाठी शैक्षणिक तसेच आर्थिक मदत करते. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया ही संस्था कायमच कार्यरत असते. विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांची वैज्ञानिक शोध व प्राचीन इतिहास जाणून घेण्याची जिज्ञासा वाढावी यासाठी चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया या सामाजिक संस्थेने बीएनवाय या आयटी कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) प्रकल्पाच्या माध्यमातून २५० मुलांची शैक्षणिक सहल पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टी येथे आयोजित केली होती.

शाळेतील अभ्यासाबरोबरच वैज्ञानिक प्रयोग व त्यामागील विज्ञान काय आहे हे प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे कळावे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा महान इतिहास विद्यार्थ्यांना कळावा यासाठी ३डी शो त्यांना दाखवण्यात आला. हाच या सहलीमागील उद्देश होता. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीच्या नियोजनात संस्थेचे समाजसेवक हेमंत अंदूरकर व ज्ञानदीप शाळेतील शिक्षकांनी सहभाग घेतला. तसेच बीएनवाय या कंपनीचे कर्मचारी, विद्यार्थी व शिक्षक यांनी उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले.
