• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भाज्यांवर गुलाल, पिळदार लोखंडी पट्ट्या, लिंबूला डोळे…कर्जत तालुका अंधश्रध्देच्या वाटेवर?

ByEditor

Jan 7, 2025

कर्जतमधील लोभेवाडी येथील काळ्या जादूचा प्रकार उघड

गणेश पवार
कर्जत :
एकीकडे जादूटोणा सारख्या भंपक आणि निरर्थक समजल्या जाणाऱ्या गोष्टी समोर असताना कर्जतकरांवर काळ्या जादुची माया कायम असल्याचे दिसून येत आहे. नुकताच कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात लोभेवाडी गावाच्या वेशीवर अज्ञातांनी देव देवस्की केल्याचा प्रकार समोर आलाय. गावात जाणाऱ्या दोन रस्त्याच्या टोकावर भाज्या, लिंबू, गुलाल व त्यात लोखंडी पिळदार पट्टी लावून गावावर करणी करण्याचा हा प्रयत्न केला गेला असल्याची अंधश्रद्धा समोर आली आहे. दरम्यान, या प्रकाराने लोभेवाडीतील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील लोभेवाडी येथे रात्रीच्या सुमारास गावात जाण्याच्या रस्त्याच्या वेशीवर मूठभर माती टाकून त्यावर भाज्या, पिळदार लोखंडी पट्ट्या, जिरे, मोहरी, लिंबू सारख्या अनेक वस्तू जमा करून ठेवल्या होत्या. त्या भाज्यांवर गुलाल आणि लिंबू चार कोनात कापण्यात आला होता. ओली माती, बाजूला राख जाळण्याचा प्रकार दिसून येत होता. गावाच्या प्रवेशद्वारावर हा प्रकार अज्ञातांनी केल्याने, सकाळच्या सुमारास बाहेर पडणाऱ्या ग्रामस्थांसमोर हा प्रकार उघड झाला. यामुळे येथील काही ग्रामस्थांच्या मनात वेगळेच काहूर माजले आहे. हा प्रकार गावावर काळी जादू करून करणी करण्याचा प्रयत्न केला गेला की गुप्तधन मिळवण्यासाठी करण्यात आला म्हणून बोंब होती. दुसऱ्या बाजूला हा वशीकरण करण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणून अंधश्रद्धा पसरली होती. दरम्यान, एकीकडे जादूटोणा यासारख्या गोष्टीत काहीच तथ्य नाही किंवा ह्या गोष्टी भंपक मानण्यासाठी अनेक संघटना, संस्था जनजागृती करीत असताना दुसरीकडे मात्र कर्जत तालुक्यात ह्या गोष्टी सर्रास होत असताना लोभेवाडी येथील या प्रकाराने ग्रामस्थ घाबरून गेलेत.

दोन दिवसांपूर्वी याच वाडीच्या नदीतीरी लिंबू कापून त्यावर डोळे काढल्याचा प्रकार उघड झाला होता. तर याही अगोदर काही वर्षापूर्वी लोभेवाडी येथील स्मशानभूमीत अज्ञातांनी दफन केलेला मृतदेह जमिनीवर काढून फुलं, गजरा पसरवून मध्यरात्रीच्या वेळी पुजा केली गेल्याचे काही ग्रामस्थ सांगत आहेत. यावेळी येथील बाबा पुजारी पळून गेले. दरम्यान नरबळी सारखे प्रकरण समोर येत असताना, गावावर कोणी करणी केली नाही ना म्हणून लोभेवाडीतील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान, आजही ग्रामीण भागात अशा अंदश्रध्देचे जाळे ग्रामस्थांवर पसरलेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आजही भगताकडे जाणे, जादूटोणा केली म्हणून घरीच बसून राहणे असे प्रकार घडत आहेत. या प्रकरणावर विश्वास ठेवत असल्याने ग्रामीण भागात जनजागृती होणे गरजेचे आहे. अशा प्रकारांवर पोलीस प्रशासनाने लक्ष ठेऊन कारवाई करण्याची गरज आहे.

सदर प्रकार हा साधारण रात्रीचे ३ ते ३.३० वाजण्याचे सुमारास केल्याचा अंदाज असुन, पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास उठलेल्या गाववाल्यांच्या हा प्रकार नजरेस पडला. सदर प्रकार हा अंधश्रद्धेशी संबधीत असल्याने व गावकऱ्यांच्या मनात सदर प्रकाराची भीती निर्माण झाली असल्याने गावचा पोलीस पाटील या नात्याने सदर प्रकाराची माहिती ही फोनद्वारे कशेळे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी थोरवे यांना दिली आहे.
-मारूती लोभी,
पोलीस पाटील, लोभेवाडी कर्जत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!