द्रोणागिरी पर्वताला धक्का न लावताच रेवस-रेड्डी सागरी महामार्ग तयार करावा – सचिन डाऊर
अनंत नारंगीकर
उरण : रायगड जिल्ह्यातील करंजा-रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंतच्या सागरी महामार्गाच्या कामाला शासनाने सुरुवात करण्याचा घाट घातला आहे. परंतु, सदर सागरी महामार्ग हा ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या द्रोणागिरी पर्वताला धक्का लावून तयार होत असेल तर या सागरी महामार्गाच्या कामाला मौजे चाणजे प्रकल्प बाधित स्थानिक शेतकरी, करंजा ग्रामस्थ, जमीनधारक, सामाजिक कार्यकर्ते, कोंढरी ग्रामस्थ यांचा विरोध राहणार आहे. तरी शासनाने या परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि ऐतिहासिक प्रसिद्ध द्रोणागिरी पर्वताला धक्का न लागता रेवस ते रेड्डी हा सागरी महामार्ग तयार करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी केली.
मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी ठरणारा रायगड जिल्ह्यातील करंजा-रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंतच्या सागरी महामार्गाचे भूमीपूजन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रेवस (रायगड) ते रेड्डी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पुलांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते. या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाची एकूण लांबी ४९८ किमी इतकी आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा सागरी महामार्ग असणार आहे. मात्र, सदर महामार्ग हा उरण तालुक्यातील मौजे चाणजे या परिसरातून जात असताना या ठिकाणावरील शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक संस्था यांना विश्वासात न घेता भू संपादन, जागेचा सर्व्हे करण्यास शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. तसेच उरण तालुक्यातील ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या द्रोणागिरी पर्वताला धक्का पोहोचविण्याचा घाट घातला जात आहे.
त्यामुळे प्रकल्पबाधित स्थानिक शेतकऱ्यांनी , सामाजिक संस्थांनी रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला विरोध दर्शविला. करंजा रेवस ते रेड्डी सागरी सेतुच्या जागेच्या मोजणी संदर्भात पवन चांडक उप विभागीय अधिकारी पनवेल यांनी सदर घटनेची माहिती घेण्यासाठी उरण तहसिल कार्यालयात संबंधित खात्याचे अधिकारी , शेतकरी यांच्या बैठकीचे आयोजन मंगळवारी (दि. ७) करण्यात आले होते. या बैठकीला उप विभागीय अधिकारी अधिकारी पवन चांडक, एमएसआरडीसीचे बोराडे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नरेश पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर हे बोलत होते. यावेळी चाणजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे, माजी सभापती ॲड. सागर कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम नाखवा, करंजा ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष कल्पेश थळी, उपाध्यक्ष देवीदास थळी, मेघनाथ थळी, मुळेखंड कोंढरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सदर बैठकीत ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या द्रोणागिरी पर्वत परिसरातून जाणाऱ्या मार्गाला सदर ग्रामस्थांनीही आपला कडाडून विरोध दर्शविला. त्यामुळे सागरी महामार्गाचे काम रखडले की काय? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
रेवस ते रेड्डी सागरी महामार्गासंदर्भात उप विभागीय अधिकारी पनवेल पवन चांडक तसेच उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला आहे.
