रायगड : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचे चित्र आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी पालघर आणि इतर ठिकाणच्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश केला. तर, रायगडमध्येही ठाकरे गटाला मोठा फटका बसणार आहे. मागील 5 दशकांपासून ठाकरेंना साथ देणाऱ्या शिलेदाराने शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत राजीनामा दिला आहे. इतरही काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मातोश्रीवर पाठवले आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर शिवसेनेत अस्वस्थता वाढू लागली आहे. रायगड, रत्नागिरी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला लोकसभेत पराभव पाहावा लागला. त्यानंतर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचे अनिल नवगणे पराभूत झाले. या पराभवामुळे शिवसेना ठाकरे गटात नाराजी वाढू लागली आहे.
संघटनात्मक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे श्रीवर्धन मतदारसंघ क्षेत्रसंघटक रवींद्र लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. रवींद्र लाड यांचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात चांगले संघटन आहे. लोकसभा निवडणुकीत अनंत गीते आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्यासाठी लाड यांनी प्रचारात झोकून दिले होते. लाड हे गेली 55 वर्षे शिवसेनेत काम करीत आहेत. वैयक्तिक कारणामुळे मी पक्षाला वेळ देऊ शकत नाही असे म्हणत त्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार खरं कारण दुसरंच असल्याचे म्हटले जात आहे.
लाड यांच्यासह रायगडमधील काही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. मातोश्रीवरून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे पक्षाची जिल्ह्यात पिछेहाट होत असल्याचा सूर दिसून येत आहे. काही ठिकाणी जबाबदार पदांवर चुकीच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली. त्याचाही फटका ठाकरे गटाला बसला असल्याचे सांगण्यात येत आहे. लाड यांच्यासह राजीनामे दिलेले पदाधिकारी हे भाजप अथवा शिंदे गटात जाणार नसल्याची माहिती आहे. राजकारणातून अलिप्त राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याचा परिणाम शिवसेना ठाकरे गटावर होणार असल्याची चर्चा आहे.
