विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यात खांब साईनगर येथील ट्रान्सफार्ममधील तांब्याच्या कॉइल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गेली तीन दिवस साईनगर गाव हे अंधारात आहे. या घटनेबाबत ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून खंडित झालेला विद्युत पुरवठा सूरू करण्यास सबंधित खात्याकडून टाळाटाळ होत असून अद्याप ग्रामस्थांना अंधाराशी सामना करावा लागत आहे.
सोमवार, दि. ६ जानेवारी रोजी पहाटे सकाळी एक ते पाचच्या सुमरास ही घटना घडली असून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल ग्रामस्थ वर्गातून व्यक्त केला जात आहे. चालू ट्रान्सफर्मावरील वीज पुरवठा खंडित करून अज्ञात चोरट्यांनी तांब्याची कॉईल लंपास केल्याची घटना घडली असून येथील ग्रामस्थ गेली तीन दिवस अंधारात असून अद्याप वीज पुरवठा सुरू करण्यास संबंधित अधिकारी वर्ग तसेच विद्युत वितरण खाते दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती कोलाड विभागीय विद्युत वितरण खात्याचे कनिष्ठ अधिकारी सुरेश सोननीस यांनी कोलाड पोलिसांना दिली. तर घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस निरिक्षक नितिन मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
याबाबत कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, mtpl/msedcl/१००/२२/३७८ कोड क्र. ४१३५४५२ या क्रमांकाचे विद्युत रोहीत्र कोणीतरी अज्ञात इसमांनी नटबोल्ट खोलून पोलवरुन खाली पाडून त्यामध्ये असणारे ऑइल सांडवून नुकसान केले. तसेच रोहीत्रातील तांब्याची कॉइल चोरून नेली असल्याची घटना सोमवारी पहाटे एक ते पाचच्या सुमारास घडली. यात तब्बल २६,००० रुपये किंमतीचे विद्युत रोहीत्र असून अंदाजे ४५ किलोग्राम वजनाची तांब्याची कॉईल असल्याचे सांगितले.
