४४ लाख रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल
अनंत नारंगीकर
उरण : न्हावा शेवा वाहतूक शाखेच्यावतीने रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचे उद्देशाने तसेच वाहन अपघातांना आळा घालण्यासाठी २०२४ माहे जानेवारी ते डिसेंबर अखेर आत्तापर्यंत मोटर वाहन कायद्याखाली एकूण ३१,६०० वाहन चालकांविरुद्ध विविध कलमाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित वाहन चालकांना एकूण २,८८,३३,००० इतक्या रकमेचा दंड आकारण्यात आला असून सदर दंडा पैकी एकूण रू ४४,६६,७०० इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती न्हावा शेवा वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.
सदर कारवाई अंतर्गत रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी वाहने पार्क करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या १४,४५० वाहन चालकांविरुद्ध, विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्या ९,५८५ चालकांविरुद्ध, चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट न वापरलेल्या ३१२५ वाहन चालकांविरुद्ध, तसेच लाल सिग्नल तोडणाऱ्या ९५० वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
न्हावा शेवा वाहतूक शाखेच्यावतीने संपूर्ण उलवे व जेएनपीटी परिसरात विशेष नाकाबंदी व तपासणी मोहीम आखण्यात आली असून कोणत्याही वाहनचालकाने मद्यप्राशन करून वाहन चालू नये व मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई सोबतच त्यांचे वाहन जप्ती अथवा वाहन परवाना निलंबन कारवाई करण्यात येईल असा इशारा देऊन, जेएनपीटी व उलवे परिसरातील वाहनचालकांनी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहने चालवताना स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मोटरवाहन कायद्याचे पालन करावे असे आवाहन न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी केले आहे.
