सलीम शेख
माणगाव : लोखंडी शीग खांद्याला मारून दुखापत करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना माणगाव शहरात दि. ७ जानेवारी रोजी घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, सिताराम टेंबे हे गेले दोन वर्षापासुन अण्णा साबळे यांचे चालु असलेल्या बांधकाम इमारतीचे शेजारील शेडमध्ये, मोर्बा रोड माणगांव येथे मोलमजुरीचे काम करुन तेथेच राहतात. दि. ७ जानेवारी रोजी ५.३० वा.च्या सुमारास सिताराम टेंबे हे राहत्या ठिकाणी जनावर किंवा साप येवू नये याकरिता राहत असलेल्या शेडलगतचे जागेमध्ये वाढलेले गवत काढत असताना आरोपी गोविंद पवार याने टेंबे यांना जवळ बोलावुन त्यांचे कानाखाली जोरात चापट मारली.
त्यावेळी टेंबे यांनी “मला काही कारण नसताना का मारलत” असे आरोपी पवार यांना विचारले असता, या गोष्टीचा आरोपी पवार यांना राग आल्याने त्याने शेजारी गॅरेजमधील लोखंडी शीग घेवून टेंबे यांचे डाव्या खांद्याला जोरात मारुन दुखापत केली. तसेच टेंबे हे उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे उपचाराकरिता गेले असताना त्या ठिकाणी आरोपी पवार याने येवुन टेंबे यांना माझ्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दिलीस तर तुला बघुन घेतो असे म्हणत जीवेठार मारण्याची धमकी दिली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. सानप करीत आहेत.
