दिघी महामार्ग भूसंपादन मोबदला रखडला
महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाकडून शेतकऱ्यांची फसवणूक
पंधरा दिवसात शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
सकलप बायपास रस्ता पूर्ण होऊन मोबदला नाही
गणेश प्रभाळे
दिघी : रायगड जिल्ह्यातील राजपुरी खाडीवर विकसित होत असलेल्या दिघी पोर्टला जोडणारा दिघी-पुणे महामार्ग म्हसळा तालुक्यातील सकलप आणि तोंडसुर या बायपास मार्गावरून काढण्यात आला आहे. मात्र, रस्ता पूर्ण होऊन अद्याप मोबदला न मिळाल्याने बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दिघी पोर्टकडून होणारी अवजड वाहतूक ही म्हसळा शहरातुन होत असताना, पर्याय म्हणून पोर्ट प्रशासनाने वाहतूक सोयीसाठी तोंडसुर (बौद्धवाडी) ते श्रीवर्धन मार्गाला जोडण्याचा बायपास मार्ग बनवण्याचा आराखडा तयार केला, जमीनी अधिग्रहण करण्याचे काम होऊन २०१९ मध्ये रस्त्याचे कामही सुरु केले. दोन वर्षात रस्ता पुर्ण होऊन बायपास मार्ग सुरू करण्यात आला. या रस्यासाठी सकलप व म्हसळा येथील बावीस शेतकऱ्यांची साधारण ५८ गुंठे जमीन गेली आहे. त्यातील जवळपास आठ शेतकऱ्यांची २६ गुंठे जमीन अधिग्रहण होऊन त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. त्यावेळी शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित करताना तीन महिन्यात जमीनीचा मोबदला देण्याचे सांगितले होते, मात्र, रस्त्याचे काम पूर्ण आणि रस्ता सुरळीत सुरू होऊन चार वर्ष उलटले तरी मोबदला दिला नाही.
आज येथील बाधित शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जमिनी गेल्या मात्र, आपल्या कुटुंबाचे शेतीवरती उदरनिर्वाह अवलंबून असल्याने हतबल झाला आहे. आम्हाला प्रशासनाकडून मदत मिळाली नसून अक्षरशः आमच्या घरादारावर नांगर चालवला गेला आहे. अशी शेतकऱ्यांनी न्यायासाठी आर्त हाक दिली आहे. परिणामी येत्या पंधरा दिवसात आमच्या जमिनीचा मोबदला मिळाली नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
गेली सहा वर्षे जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून अधिकाऱ्यांच्या मागे पाठपुरावा करत आहे. मात्र, अद्याप एक दमडी मिळाली नाही. आता तरी प्रशासनाने लक्ष घालावे.
-संतोष काते,
बाधित शेतकरी.
या प्रकरणाकडे बघितलं जाईल. हेड ऑफिसकडे प्रस्ताव गेला आहे. माहिती घेऊन सांगतो.
-सारंग इनामदार,
अभियंता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ
