घन:श्याम कडू
उरण : तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. तालुक्यातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची व अपूर्ण अवस्थेत आजही आहेत. याबाबत खोपटे गावातील तरुणांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी त्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
तालुक्यातील खोपटे गावाच्या मेन पाण्याच्या लाईनचे जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेले काम आजतागायत पूर्ण झालेले नाही. याबाबत गावातील तरुणांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांची त्यांच्या अलिबाग कार्यालयात भेट घेऊन समस्या मांडत सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. त्यांनी त्वरित उरणमधील त्यांच्या अधिकारी रुपाली म्हात्रे यांच्याशी मोबाईलद्वारे चर्चा करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सांगितले आहे. यावेळी खोपटे गावातील सुजाण नागरिक गोरख ठाकूर, रोहित भगत, वैभव घरत हे उपस्थित होते.
