• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन तालुक्यातील वडवली शाळा अंधारात!

ByEditor

Jan 10, 2025

वडवली शाळेतील मुलांचे भवितव्य अंधारात

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गेल्या वर्षभरापासून वीजपुरवठा झालेला आहे. जानेवारी 2024 मध्ये या शाळेच्या इमारतीचे खा. सुनीत तटकरे यांच्या हस्ते उदघाटन केले होते. मात्र वर्ष झालं तरी विद्यार्थ्यांच्या वर्ग खोल्यांत अंधार आहे. विशेष म्हणजे वडवली हे सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेले गाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, वडवली गावातील अत्यंत जुनी व जीर्ण झालेली जिल्हा परिषदेची मराठी शाळा मोडकळीस आली होती. शाळेची धोकादायक स्थिती पाहता खा. तटकरे यांनी पुढाकार घेत सीएसआर फंडातून हि इमारत नवीन बांधली. गेल्यावर्षी इमारतीचे उदघाटन करून विद्यार्थ्यांना खोल्या उपलब्ध करून दिल्या. मात्र महिने उलटून गेले तरी काम पूर्ण झाल्यावर लाईट फिटिंग न केल्याने मागील काही महिन्यापासून विद्यार्थ्यांना अंधारात बसावं लागत आहे. शाळेत वीजपुरवठा बंद अवस्थेत आहे. वीज नसल्याने ई-लर्निंग सारख्या अत्याधुनिक शैक्षणिक प्रणालीचा बट्ट्याबोळ झाला आहे. याशिवाय डिजिटल शाळेचा देखील बोजवारा उडाला आहे. या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या साडेतीनशे आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळेत मुले कमी झाल्याचा कांगावा करावा आणि मुले शिकत असताना सुविधा द्यायच्या नाही अशा जिल्हा परिषद विभागाच्या दुट्टपी भूमिकेवर ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा टिकाव्यात आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र प्रत्यक्षात गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना त्यांच्या मुलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याचे या प्रसंगातून अधोरेखित होत आहे, त्यामुळे शालेय अधिकारी नेमके करतात काय? असा प्रश्न मुलांचे पालक उपस्थित करत आहेत.

वडवली शाळेत वर्षभर वीजपूरवठा नाही. विद्यार्थ्यांच्या वर्गखोल्या लाईटशिवाय कश्या राहू शकतात? कसे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणार? याबाबतीत शिक्षणाधिकाऱ्यांकडे बोलणे झाले, पत्र दिले मात्र कार्यवाही काहीच नाही.
-सुनील नाकती,
ग्रामस्थ

वडवली शाळेत वीजपुरवठा नसल्याबाबत मला माहित नाही. मात्र वर्गखोल्यांतील लाईट फिटिंगबाबत पाठपुरावा घेते. शाळेत कायमस्वरूपी मुख्याध्यापक मिळावे यासाठी देखील पाठपुरावा घेते.
-पुनिता गुरव,
शिक्षणाधिकारी, अलिबाग

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!