सलीम शेख
माणगाव : तुलसी विवाहानंतर ग्रामीण भागात लग्नसराई खऱ्या अर्थाने सुरू होते. अनेक वधू-वर पित्यांचे पालक, नातेवाईक विवाह इच्छुक वधू-वरासाठी सुयोग्य जोडीदार शोधायला सुरुवात करतात. कोकणातील काही तालुक्यात मात्र या विवाह इच्छुक वरांच्या पालक, नातेवाईकांना वेगळाच अनुभव येत आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या विवाह इच्छुक मुलींची अपेक्षा वाढली असून त्यांना गावात राहणारा वर नको असल्याचे दिसून येत आहे. कर्तव्य असलेल्या वधू पिता, नातेवाईक वर मुंबईत राहतो का?, स्वतःची खोली आहे का? पगार चांगला आहे का? गाडी आहे का? हे प्रश्न पहिले विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांची उत्तरे हो आली तरच पुढील बोलणी होत आहेत. नाहीतर पुढील बोलणीचा विषय तेथेच थांबविण्यात येत आहे.
दुर्गम तालुक्यातील काही तरुण आजही गावाकडे राहून शेती, भाजीपाला उत्पादन व तत्सम रोजगार करतात. मात्र बदलत्या काळानुसार शिकलेल्या मुली जीवनसाथी निवडताना शहरातील राहणारा व शहरात स्वतःचे घर असलेल्या जोडीदारासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या विवाह इच्छुक तरुणांचे लग्न जमविताना पालकांची पूर्ण दमछाक होत आहे. अनेक गावांत लग्न जमावयास हवे म्हणून कर्तव्य असलेल्या तरुणांना काही दिवस शहरात खोली घेऊन राहायला पाठवित आहेत. जेणेकरून कोठेतरी लग्न जमवून येईल. वधू बरोबरच पालकही मुलीचे लग्न जमविताना शहरातील राहणारा व स्वतःची खोली, घर असणाऱ्या जावयास पसंती देताना दिसत आहेत. गावी राहतो, चांगली आर्थिक स्थिती असली तरी अशा विवाह इच्छुक तरुणांची लग्ने जुळण्यास अनंत अडचणींना पालकांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षणाचा झालेला प्रसार व शहरांचे आकर्षण यामुळे अशा प्रकारची समस्या पुढे येत असल्याचे जाणकार सांगत आहेत.
शिक्षण अपूर्ण, शहरात राहण्याच्या सुविधेचा अभाव यामुळे गावी असलेल्या विवाह इच्छुक तरुणांना अनेक ठिकाणी विवाहासाठी प्रस्ताव ठेवूनही नकार मिळण्याचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ही समस्या समाजात दिसून येत आहे. वधू कडील मंडळी व स्वतः वधू अशा प्रकारे मागणी करीत आहेत. त्यामुळे गावी राहणारे व व्यवस्थित सक्षम असलेल्या वरांनाही वधू मिळताना अडचणी जाणवत आहेत.
-दत्ताराम यादव
पालक
मुलींनी अशा प्रकारची अपेक्षा ठेवण्यात गैर काही नाही. गावात असणाऱ्या सोईसुविधांचा अभाव यामुळे मुली शहरांकडे राहणे पसंत करीत आहेत. त्याचप्रमाणे शहरात स्वतःची खोली, प्लॅट असेल तर अशाच स्थळांना मुली होकार देताना दिसत आहेत. भविष्याचा विचार करून मुली असा निर्णय घेत असाव्यात.
-श्वेता मोंडे
तरुणी
ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत ही समस्या जास्त प्रमाणात दिसते. मुलींचे शिक्षणाचे वाढलेले प्रमाण व कमी झालेली संख्या यामुळे विवाहाच्या समस्या दिसत आहेत. पूर्वी मुलींच्या पालकांकडून विचारणा होत असे. आता मात्र वर पित्यांना वधू संशोधन करण्यास खूप अडचणी जाणवत आहेत. आजकाल शहरातील राहणारा वर, त्याचे शहरात स्वतःचे घर या बाबी महत्वाच्या झाल्या आहेत.
-रामदास जाधव
