• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जनजीवन मिशन अंतर्गत अर्धवट कामामुळे खोपटे गावात पाणी टंचाई

ByEditor

Jan 11, 2025

अनंत नारंगीकर
उरण :
जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ या संकल्पनेखाली केंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशातील सर्व ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबांना नळ योजनेद्वारे पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जल जीवन मिशन सुरू केले होते. मात्र उरण तालुक्यातील खोपटे गावांमध्ये मात्र हे काम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामूळे संथगतीने होत आहे. त्यामुळे मुख्य जलवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने खोपटे गावात पाणी टंचाई सुरू आहे. मुख्य पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी खोपटे ग्रामस्थ करीत आहेत.

उरण तालुक्यातील खोपटे गावात जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ या योजनेच्या कामात कंत्राटदाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चालढकल करण्यात येत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत खोपटे ते चिरनेर गावापर्यंत अपूर्ण असलेल्या पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी खोपटे गावातील ग्रामस्थ करत आहेत. हे काम पूर्ण न झाल्यामुळे खोपटे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. सातपाड्यांनी वसलेल्या या गावात जवळपास एक दिवसाआड एक फक्त एक तासासाठी पाणी येत आहे. त्यामुळे या गावात पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली आहे असे गृहिणींकडून बोलले जात आहे.

२०२१ ते २०२२ रोजी जलजीवन मिशन अंतर्गत खोपटे ते चिरनेर या पाईपलाईनला मुख्य हेटवणे धरणाच्या पाईपलाईनला जोडण्याचे काम मंजूर झाले होते. मे २०२३ रोजी या जलजीवन मिशन अंतर्गत मुख्य पाईपलाईनच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. मात्र संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. कंत्राटदार देखील हे काम पूर्ण करण्यास कोणत्याही प्रकारचे स्वारस्य दाखवत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे गावात पाणीटंचाईची समस्या डोके वर काढत आहे. यासंदर्भात गावातील लोकप्रतिनिधी आणि आमदार महेश बालदी हे आवाज उठवित नसल्याचे सध्या खोपटा गावातील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!