टायर फुटल्याने रुग्णवाहिकेचा अपघात, चार प्रवासी जखमी
प्रतिनिधी
उरण : मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावरून मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने अपघात झाला होता. यावेळी, रुग्णवाहिकेतील चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना नवीमुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भिवंडी येथील रुग्णवाहिका ही भरत बाबुराव पांचाळ यांचा मृतदेह घेऊन सोलापूरला निघाली होती. यावेळी, गाडीमध्ये वैजनाथ पांचाळ हे पत्नी आणि अकरा वर्षीय मुलीसमवेत रुग्णवाहिकेतून प्रवास करीत होते. यादरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील खालापूरनजीकच्या माडप बोगद्यानजीक आले असता रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने अपघात झाला.
दरम्यान, रुग्णवाहिकेचा मागचा टायर फुटल्याने गाडी रस्त्यातच पलटी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, या अपघातात गाडीतील चार प्रवासी जखमी झाल्याने त्यांना नवीमुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले यांनी सांगितले आहे. तर, या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक किरकोळ जखमी झाला असून महिला आणि पुरुष यांना फ्रॅक्चर असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर, रूग्णवाहिकेच्या अपघातानंतर मृत इसमाचा मृतदेह हा दुसऱ्या रूग्णवाहिकेने रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या अपघातात वैजनाथ निवृत्ती पांचाळ (६०), रंजना पांचाळ (५०), अंतरा भरत पांचाळ (११) आणि चालक अशोक पटेल हे जखमी झाले आहेत.
