गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील कुसूमादेवी मंदीर मार्गावर राहणाऱ्या शशांक केळस्कर यांच्या घराच्या परिसरात ८ फुट लांबीचा अजगर अढळून आला. या अजगराने खुराड्यातील ३ कोंबड्या आणि २ बदकांना गिळले.
या ठिकाणी सुहास गुरव यांनी कुक्कूट पालन करून गावठी अंडी विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. काही महिन्यांपासून त्यांनी या व्यवसायाला सुरूवात केली होती. मोठयाप्रमाणात गावठी अंडी तयार करण्यासाठी ते कोंबड्यांची पैदास करत आहेत. कोंबड्या ठेवण्यासाठी त्यांनी खास खुराडा बनवला आहे. मात्र, बुधवार (दि. 26) रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास त्यांनी कोंबड्यांचा खुराडा उघडला असता त्यांना आतमध्ये सुमारे ८ फुट लांबीचा अजगर आढळून आला. या अजगराने ३ कोंबड्या आणि २ बदक गिळले आणि या व्यवसायिकाचे नुकसान केले. तत्काळ सर्पमित्र सुशांत भोसले यांना पाचारणा केले. त्यांनी त्या अजगराला कोणतीही इजा न करता पकडून नैसर्गिक आधिवासात सोडले.