मोरबा रोड ते बामणोली रोड न. पं. ची धडक कारवाई
सलीम शेख
माणगाव : शहरातील दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढतच चालली आहे. यावर उपाय म्हणून मोरबा रोड व्हाया कालव्या मार्गे ते बामणोली मार्ग आणि बामणोली मार्ग ते मुंबई गोवा महामार्ग या मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी या बाह्यवळण मार्गावरील बेकायदेशीर आणि अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करुन माणगाव नगर पंचायतीने ही धडक कारवाई शनिवार दिनांक ११ जानेवारी रोजी सायंकाळी करण्यात आली. त्यामुळे या मार्गाचे दुपदरीकरण होऊन हा मार्ग रहदारीला मोकळा होणार आहे.

माणगाव शहरात सध्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण आणि हतबल झाले आहेत. मुंबई गोवा महामार्ग आणि कळमजे जोड रस्त्या जवळील बायपास महामार्गाचे काम विविध कारणांमुळे बंद अवस्थेत आहे. शहरातील काळ आणि गोद नदीवरील पूलांची कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे सातत्याने माणगाव शहरातील वाहतुकीची कोंडी वाढतच चालली आहे. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून मोरबा रोड ते बामणोली रोड या मार्गावर अनाधिकृत बांधकामांचे अडथळे निर्माण होत होते. ती बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. हा मार्ग आता लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे माणगाव शहरातील वाहतुकीची कोंडीतून मोठ्या प्रमाणात सुटका होईल असा विश्वास नगरपंचायतीने केला आहे.

नुकतीच माणगाव येथील तहसील कार्यालयात खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्या दृष्टीने नगरपंचायत मार्फत तातडीने कार्यवाही करुन हा मार्ग नव्याने दुपदरीकरण करण्यासाठी मोकळा झाला असून या मार्गाचे थांबलेले काम सुरू झाले आहे. हा मार्ग पुर्ण होण्यासाठी दोन कोटी रुपये अपेक्षित खर्च असून ६० लाख रुपये मंजूर झाले आहेत. उर्वरित १ कोटी ४० लाख रुपये खासदार सुनील तटकरे शासनाच्या विविध योजनेतून मंजूर करून देणार आहेत.
या पर्यायी मार्गामुळे मुंबई येथून श्रीवर्धन, हरी हरेश्र्वर, म्हसळा येथे जाण्यासाठी आणि श्रीवर्धन म्हसळा येथून मुंबई, पूणे येथे जाण्यासाठी माणगाव शहरातून न जाता हा मार्ग सोयीस्कर ठरणार आहे. माणगाव शहरातील जुन्या महामार्गाचे चौपदरीकरण अद्यापही झालेले नाही. काळ आणि गोद नदीवरील पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून शहरात ठिकठिकाणी नेहमीच वाहतूकीची कोंडी होत असते. तसेच खरवली जोड रस्ता ते सुरव, मोरबा गाव येथूनही वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हि बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त केल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. अशाच प्रकारे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शहराच्या बाजारपेठेतील महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या बेकायदेशीर आणि अनाधिकृत बांधकामे तातडीने जमीनदोस्त करावी अशी मागणी महामार्ग कार्यालयाकडे करण्यात आली आहे. मात्र महामार्ग कार्यालय केवळ व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात समाधान मानत आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा शहरातील बाजारपेठेच्या बेकायदेशीर बांधकामे, दुकाने, टपरीधारक यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कारवाईचा बडगा उगारला नसून त्यांना अभय दिले आहे. त्यामुळे वाहतूकीच्या कोंडीत आणखी भर पडली आहे.
