क्रीडा प्रतिनिधी
रायगड : पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्यावतीने रसायनी पाताळगंगा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटसच्या मैदानावर गुरुवार, दि. ९ जानेवारी रोजी दिवसरात्र लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा अंतिम सामना प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल विरूद्ध पीसीएसए क्रिकेट अकॅडमी पनवेल ह्या दोन संघांमध्ये रात्रीच्या प्रकाश झोतात खेळला गेला. त्यामध्ये पीसीएसए क्रिकेट अकॅडमी संघाने प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघावर १२ धावांनी विजय मिळवून अंतिम विजयी होण्याचा मान मिळवला आहे.
अतिशय रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून पीसीएसएला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. पीसीएसए संघाचा सलामीचा तंत्रशुद्ध धडाकेबाज फलंदाज युग जोशी यांनी चौफेर टोलेबाजी करत ६५ चेंडूमध्ये १२ चौकार आणि ४ षटकार खेचून १०७ धावा काढत शतक ठोकले. दुसऱ्या बाजूने आर्यन काळे यांनी ३९ धावा काढून युगला साथ दिली. २० षटकांच्या समाप्तीनंतर पीसीएसए संघांनी ३ गडी बाद १५९ धावा फलकावर नोंदवल्या. प्रतिक क्रिकेट अकॅडमी संघाकडून अर्णव साळवी यांनी २ तर अंश माळी यांनी १ फलंदाज बाद केला.
प्रत्युत्तर देताना प्रतिक क्रिकेट अकॅडमी संघांनी आक्रमक सुरुवात केली. सलामीचा डावखुरा फलंदाज पार्थ पवार यांनी २४, श्रेय पाटील यांनी १४ धावा काढून संघाला चांगली सुरवात करून दिली. मधल्या फळीत वेदांत बोंबले यांनी तंत्रशुद्ध फलंदाजी करत ५४ तर दुसऱ्या बाजूने ओम शिंदे यांनी २९ धावा काढल्या. २० षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिक क्रिकेट अकॅडमी संघांनी ५ गडी गमावत १४७ धावा केल्या. पीसीएसए संघाकडून रुद्र खोपकर, राज मते, देव सिंह, युग जोशी, आयुष पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. पीसीएसए संघांनी सामना १२ धावांनी जिंकला.
स्पर्धेचा मालिकावीर व उत्कृष्ठ फलंदाज म्हणून युग जोशी, उत्कृष्ठ गोलंदाज अनय कांबळे, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक अथर्व थोरात यांना प्रसिद्ध उद्योजक लावास लुब्रिकंटसचे मालक रोट्रियन रतन खारोल, सुरेंद्र जोशी, आरडीसीएचे सदस्य ॲड. पंकज पंडित, सागर कांबळे, प्रतिक मोहिते, संदीप जोशी, संकेश ढोले, निशांत माळी, आदेश नाईक, विकास पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
