मोकळ्या जागेची कमतरता, आभासी खेळाचा परिणाम
विश्वास निकम
कोलाड : मनोरंजनाची बदललेली साधने, तरुणाईच्या बदललेल्या आवडी निवडी, शहरातील हरवलेली मोकळी जागा व मैदाने, भ्रमाणध्वनी मनोरे आदी विविध कारणांमुळे पतंगाची दुकाने ग्राहकांशिवाय ओस पडली आहेत. त्यामुळे बाजारात यंदा पतंग व मांज्याच्या विक्रीत सुमारे ५० ते ६० टक्के घट झाली आहे.
आधी संगणक आणि त्यानंतर भ्रमाणध्वनीच्या जाळ्यात अडकलेली तरुणाई मैदानी खेळापेक्षा आभासी खेळामध्ये जास्त रमायला लागली आहे. यामुळे जुन्या काळातील अनेक खेळ काळाच्या ओघात लोप पावत असून आता त्यामध्ये पतंगाचाही समावेश झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पतंग आणि मांज्याच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.
पतंग व्यवसाय जानेवारीपासून तेजीत असायचा. या महिन्यात पतंग खरेदीसाठी गर्दी असायची. यामुळे दुकानात दहा कारागीर पतंगाची विक्री करण्यासाठी कमी पडायचे. यामुळे दहा माणसांचे कुटुंब आरामात जीवन जगत होते. आता पतंगाच्या दुकानात अजिबात गर्दी दिसत नाही. काही ठराविक पतंग प्रेमी सोडले तर तरुणाईने पतंग उडविण्याकडे पाठ फिरवली असल्याने या व्यवसायाला उतरती कळा लागली असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी संक्रात सणामध्ये पतंग उडवण्याच्या स्पर्धा असायच्या परंतु, कालांतराने लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या. क्रिकेट, कबड्डीबरोबर आधुनिक काळातील तरुणाई मोबाईलमध्ये गुंतली, याचा परिणाम हळूहळू पतंग उडविण्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. हे असेच सुरु राहिले तर पतंग खेळ इतिहास जमा होईल.
दिनकर सानप
सामाजिक कार्यकर्ते
