दुचाकीस्वारांना करावी लागते तारेवरची कसरत, अपघाताचा धोका वाढला
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील सुकेळी खिंडीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या मोठमोठया झाडांमुळे येथे रात्रीच्या वेळी अंधार पसरलेला असल्यामुळे या ठिकाणी येणारी-जाणारी वाहने वाहनचालकांच्या त्वरित लक्षात येत नाहीत. तर दुचाकीस्वारांना येथून मार्ग काढतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे या ठिकाणी अपघात होतांना दिसत असुन, या ठिकाणी पथदिवे बसविण्यात यावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून करण्यात येत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील चौपदरीकरणाचे काम हे गेली सतरा वर्षांपासून सुरु आहे. परंतु हे काम येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याच्या इराद्याने वेगात सुरु असुन सुकेळी खिंडीतील दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल. यामुळे येथील वाहतूक ही वेगात सुरु होईल. परंतु, या रस्त्यावर असणाऱ्या अंधारामुळे मोठमोठे अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
मुंबई-गोवा महामार्गावर असंख्य पर्यटन स्थळे, औद्योगिक क्षेत्र तसेच शाळा, कॉलेज असल्यामुळे या मार्गावर छोट्यामोठया वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. यामुळे सुकेळी खिंडीतील रस्त्याला दोन्ही बाजूला असणारी मोठं-मोठी झाडे, शिवाय या रस्त्याला असणारे चढउतार व अवघड वळणे रात्रीच्या अंधारात दिसत नाही. तसेच आजूबाजूचा भाग हा जंगलाचा असल्यामुळे या जंगलातून वन्यप्राणी रात्रीच्या वेळी रस्त्यावर येतात व वाहनांखाली येऊन जखमी होतात. यामुळे वाहनांचेही मोठया प्रमाणात नुकसान होते. या समस्या टाळण्यासाठी सुकेळी खिंडीत पथदिवे बसविण्यात यावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या उंच-उंच झाडांमुळे या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस प्रचंड अंधार असतो. शिवाय येथे तीन ते चार किलोमीटर पर्यंत लोकवस्ती नाही. अशावेळी कोणताही अपघात झाला तर उपाययोजना करण्यासाठी विलंब लागतो. अंधारात होणारे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी पथदिवे बसविण्यात यावेत.
-भिवा पवार
सामाजिक कार्यकर्ते
