दरवर्षी केवळ शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केला जातो कार्यक्रम
घनःश्याम कडू
उरण : उरणमध्ये घडलेल्या शौर्यशाली शेतकरी आंदोलनाचा 41वा स्मृतिदिन कार्यक्रम उद्या जासई आणि परवा पागोटे येथे होणार आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हा कार्यक्रम केवळ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा होणार का? असा प्रश्न पडला आहे. लोकप्रतिनिधी येऊन केवळ कार्यक्रमात शायनिंग मारून जातात, मात्र त्यात दिलेली आश्वासने नंतर वर्षभर त्या पुढारी लोकांना देखील आठवणीत राहत नसतात. त्यामुळेच प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यातूनच पुढारी मंडळींवर स्थानिक भूमिपुत्रांचा विश्वासच राहीला नसल्याने अवघ्या पन्नास ते शंभर प्रकल्पग्रस्तांचे उपस्थितीत हुतात्मा स्मृतिदिन कार्यक्रम उरकून घ्यावा लागत आहे.
त्यामुळे केवळ जासई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे सभागृह भरलेला तरी दिसतो. तीच गत उद्याच्या कार्यक्रमाचीही होण्याची दाट शक्यता आहे. प्रकल्पग्रस्त या कार्यक्रमाकडे सातत्याने पाठ फिरविण्याच्या अनेक कारणांपैकी नेत्यांनी दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याचे मुख्य कारण असल्याचे आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांना दीबांच्या नंतर वालीच उरला नसल्याचे मुख्य कारण असल्याची बाब या निमित्ताने समोर येत आहे.
1984 साली उरणच्या शेतकऱ्यांनी तत्कालीन शासनाच्या विरोधात सिडको जमीन संपादनास विरोध करणारे आंदोलन केले होते. त्या आंदोलकांवर सरकारच्यावतीने करण्यात आलेल्या गोळीबारात 5 जणांना वीर मरण आले होते. या हुतात्म्यांच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम दरवर्षी 16 जानेवारीला जासई येथे आणि 17 जानेवारीला पागोटे येथे साजरा केला जातो. मात्र मागील अनेक वर्षे हा कार्यक्रम केवळ विद्यार्थांच्या उपस्थितीवर निर्भर राहिला असल्याचे जाणवत आहे. विशेष म्हणजे ज्या आंदोलनामुळे प्रकल्पग्रस्तांना जेएनपीटी सारख्या प्रकल्पात गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळू शकल्या त्या जेएनपीटीतील सर्व प्रकल्पग्रस्त कामगार आणि त्यांचे कुटुंबीय जरी या कार्यक्रमाला आले तरी सभागृह भरून जाऊ शकते. मात्र केवळ हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच कामगार या कार्यक्रमाला उपस्थित राहत असल्याचे मागील अनेक कार्यक्रमांतून दिसून आले आहे.
गावागावातून दवंडी पिटवून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची सक्ती करण्याची गरज असतांना ते देखील कोणत्याच गावाकडून होत नाही. ज्या गावांना सिडको आल्यामुळे समृद्धी आली त्या अनेक गावचे लोकप्रतिनिधी देखील कार्यक्रमाकडे फिरकत नसल्याचे विदारक चित्र मागील अनेक वर्षे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या कार्यक्रमात तरी शे पाचशे प्रकल्पग्रस्त जासईच्या हुतात्मा मैदानावर दिसणार का हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे.
