रायगडसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला घरघर?
भाजपा प्रवेशामुळे कोकणातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचाच वरचष्मा राहणार!
मिलिंद माने
मुंबई : शिवसेना फुटीनंतर महाविकास आघाडी सत्तेवरून पाय उतार झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा झालेला दारुण पराभव पाहता कोकणातील शिवसेनेला घरघर लागली असून याचा भविष्यात परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होणार असून महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती, जिल्हा परिषद ,पंचायत समिती व ग्रामपंचायत तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका या सर्वच निवडणुकीवर कोकणात भाजपाचा वरचष्मा राहणार असल्याचे संकेत या निमित्ताने प्राप्त होत असून कोकणातील शिमगा सणापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी कोकणात शिवसेनेचा शिमगा करणार आहेत.
मागील तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेली फुट व महाविकास आघाडी सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कोकणासह मुंबई व संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजपा या सर्व पक्षांचा विरोध, संघर्ष करावा लागला. त्यातच मुंबई वगळता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील त्याचीच पुनरावृत्ती झाली व या पाच जिल्ह्यातून केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातून एकमेव भास्कर जाधव वगळता एकही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाला नाही. यामुळे शिवसेनेतील असंतोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना ज्या पद्धतीने दारूण पराभव पत्करावा लागला, त्यामुळे भविष्यात निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गणिताबरोबर राजकीय पाठिंबा असल्याशिवाय निवडणुका लढणे अशक्यप्राय असल्याचे मत या पाचही जिल्ह्यातील शिवसैनिकांचे तसेच निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांचे झाले आहे. आर्थिक निकषाच्या व सत्तेच्या जोरावरच निवडणुका लढणे भविष्यात शक्य होणार असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठ्या प्रमाणावर गळती लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून तीन वेळा विधानसभेत निवडून आलेले राजन साळवी, वैभव नाईक सारख्या मातब्बर उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो. या पराभवामुळे भविष्यात निवडणूक किती अवघड आहे याची कल्पना या पराभूत उमेदवारांना आली असल्याने अनेकांनी आता सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजपाची वाट धरण्याचे मनोमन ठरवले असून भाजपा प्रवेशामुळे कोकणातील शिवसेनेला मोठा प्रमाणावर धक्के बसणार असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन माझ्या पराभवाला कोण कारणीभूत आहे याबाबत वस्तुस्थिती सांगितली होती. त्यांचा रोष हा मुख्यतः लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले विनायक राऊत यांच्यावर होता. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मी जिल्हाप्रमुखांना काढू की विनायक राऊत यांना काढू असा प्रति प्रश्न राजन साळवी यांना केल्याने राजन साळवी यांनी मातोश्रीतून निघणे पसंत केले व भाजपाची वाट धरणे मनोमन ठरविले. त्याचीच पुनरावृत्ती रायगड जिल्ह्यातील १९४ विधानसभा मतदारसंघातील महाडच्या माजी नगराध्यक्ष व विधानसभेच्या पराभूत उमेदवार स्नेहल माणिकराव जगताप यांनी देखील करण्याचे ठरवले आहे. त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीत भाजपातून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली हे देखील पुन्हा स्वगृही परतणार असल्याचे बोलले जात आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आलेले बाळ माने यांचे मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष होणारे रवींद्र चव्हाण यांच्याशी जमत नसल्याने त्यांचा मात्र भाजपा प्रवेशाला अडथळा आहे.
कोकणातील रायगडसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी भाजपा प्रवेशाचे संकेत दिले असल्याने त्याचीच पुनरावृत्ती ठाणे व पालघर जिल्ह्यात होणार असल्याने कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला घरघर लागणार असल्याचे संकेत या सर्व जिल्ह्यातील शिवसेनिकांकडून बोलले जात आहे.
कोकणातील रायगडसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी भाजपाची वाढ धरली असल्याने त्याची पुनरावृत्ती ठाणे व पालघर जिल्ह्यात होणार असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या पाचही जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवार मिळण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
पाच जिल्ह्यात भाजपाचा वरचष्मा राहणार?
तब्बल पाच वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल महिन्यापासून होणार आहेत. या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, नवी मुंबई, मीरा भाईंदर या महानगरपालिका व अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषद तर पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महानगरपालिका, पालघर, डहाणू, वाडा या नगरपरिषदा तर रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका, उरण, कर्जत, खोपोली, माथेरान, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड या नगरपरिषदा तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर लांजा, रत्नागिरी, राजापूर या नगरपरिषदा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली, मालवण, सावंतवाडी या नगरपरिषदा तर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पूर्णपणे संपवण्याचे धोरण आखत कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पराभूत उमेदवारांना भाजपात घेऊन याबाबतची रणनीती आखत आहे. यामुळे भविष्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कोकणातून घरघर लागणार असल्याचे संकेत या निमित्ताने प्राप्त होत आहेत.
कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यासह ठाणे व पालघर जिल्ह्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती झाली तर ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यासह कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून निवडून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन जागांवर देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागण्याचे संकेत नाकारता येत नाहीत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला जर यश मिळाले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून विधान परिषदेत जाणारे दोन आमदारांच्या संख्येला शिवसेना पक्षाला मुकावे लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे उमेदवारच या निवडणुकीत मतदार असतात.
फेब्रुवारी महिन्यातच कोकणात शिवसेनेचा शिमगा होणार!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपा प्रवेश करणारे राजापूरचे पराभूत उमेदवार व माजी आमदार राजन साळवी यांच्यापाठोपाठ पराभूत उमेदवार राजन तेली व स्नेहल माणिकराव जगताप यांचा पक्षप्रवेश फेब्रुवारी महिन्यात होणार असून कोकणात चाकरमान्यांचा महत्त्वाचा होळीचा सण हा १३ मार्चपासून सुरु होत असून या कोकणातील शिमग्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा शिवसेनेचा शिमगा करण्याच्या तयारी असल्याचे या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
