क्रीडा प्रतिनिधी :
रायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या इनफोकस पिक्चर ऍण्ड एचआर फिटनेस एकदिवसीय ४० षटकांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी लीग स्पर्धेला पनवेल येथील गावदेवी टेंभोडे येथील फॉर्टी प्लस मैदानावर सुरुवात झाली आहे. आरडीसीएचे खेळाडू रोहित कार्ले व हृषिकेश राऊत यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
स्पर्धेचा उद्घाटनीय सामना जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड डोलवी विरूद्ध स्पोर्टी-गो क्रिकेट अकॅडमी कळंबोली संघांमध्ये झाला. रायगड जिल्ह्यातील एकूण २१ अकॅडमी व क्लबच्या संघांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला असून स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद फेरीनुसार खेळवली जाणार आहे. ४० षटकांचे एकूण २८ सामने रायगड जिल्ह्यातील विविध मैदानावर होणार आहेत. स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड रायगड जिल्ह्यच्या संघात केली जाणार असून पुढे रायगडचा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरजिल्हा निमंत्रित निवड चाचणी स्पर्धेत सहभाग घेईल. सदरच्या स्पर्धेला खोपोली येथील रोहित कार्ले यांच्या इनफोकस पिक्चर व अलिबाग येथील हृषिकेश राऊत यांच्या एचआर फिटनेस जिम यांनी पुरस्कृत केले आहे.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
