• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गरोदर ठेवणाऱ्या नराधमाला जन्मठेप आणि २५ हजार रूपये दंड

ByEditor

Jul 27, 2023

खोपोली पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा

अमूलकुमार जैन
अलिबाग :
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील अल्पवयीन पीडितेला धमकी देवून तिच्यावर बलात्कार करून गर्भवती करणारा आरोपी रविंद्र महादेव जाधव, (वय ५० वर्षे, रा. नवनाथ कॉलनी, खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड) यास पनवेल येथील सत्र न्यायालयात भा. द. वि. कलम ३७६ (२) (जे) (एन) व सकलमका ५(जे) (ii) (1) खाली दोषी धरून जन्मठेप व २५ हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

रविंद्र महादेव जाधव याने सप्टेंबर २०१३ मध्ये अल्पवयीन पिडीतेच्या घरी ती एकटी असल्याचा फायदा घेवून जबरदस्तीने शरीरसंबंध केले व आई-वडिल व इतर कोणाला सांगितल्यास तुझी जीभ कापून टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर सप्टेंबर २०१३ ते जून २०१४ या कालावधीमध्ये पीडित मुलीच्या घरी कोणी नसताना पिडीत मुलीसोबत शरीरसंबंध केले. सदर शरीरसंबंधामधून पीडित मुलगी ही आठ महिन्याची गरोदर राहिली. पिडीत मुलीच्या आईने तिची तब्बेत ठीक नसल्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता, पिडीत मुलगी ही आठ महिन्याची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.

सदर प्रकाराबाबत पिडीताच्या आईने पीडितेस विचारले असता पीडितेने रविंद्र महादेव जाधव या आरोपीने सदर प्रकार जबरदस्ती करीत शरीर संबंध केल्याचे सांगितले. पिडीतेने बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भा. द. वि. कलम ३७६ (२) (जे) (एन), ५०६ व पोक्सो कलम कायदा २, ४, ७, ११ अन्वये खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता. खोपोली पोलीस ठाणे यांनी सदरच्या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

सदरच्या खटल्याची सुनावणी सहा. अति. सत्र न्यायाधीश शाइदा शेख यांचे न्यायालयात झाली. या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता, अॅड प्रतिक्षा वडे वारंगे यांनी एकूण १० साक्षीदाराची साक्ष नोंदविली. सदर केसमध्ये पिडीत मुलीची आई, पिडीत मुलगी तसेच वैद्यकीय अधिकारी आणि तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. तपासिक अंमलदार खोपोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक आर. एन. राजे यांनी केलेला तपास महत्वाचा ठरला तसेच पैरवी महिला पोलीस शिपाई दिक्षा राठोड व पोलीस शिपाई स्वप्नील पानसरे यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. प्रतिक्षा वडे वारंगे यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद आणि दाखल केलेले न्यायनिर्णय ग्राह्य धरून सहा. अति. सत्र न्यायाधीश शाइदा शेख यांनी दि. २७.७.२०२३ रोजी आरोपी रविंद्र महादेव जाधव याला भा. द. वि. कलम ३७६ (२) (जे) (एन) व पोक्सो कलम कायदा ५ (जे) (ii) (I). ६ खाली दोषी धरून जन्मठेप व २५ हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

या घटनेच्या निर्णयामुळे यापुढे जो अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंग करेल अशांना न्यायालय जन्मठेपेची शिक्षा देईल असा संदेश संपूर्ण जनतेस गेलेला आहे व या न्यायनिर्णयाचे स्वागत स्थानिक नागरिक करित असल्याचे विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. प्रतिक्षा वडे-वारंगे यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!