• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

एमएमआरडीए च्या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध!

ByEditor

Jan 18, 2025

हुतात्म्यांच्या चिरनेर भूमीतून दिली आंदोलनाची हाक

अनंत नारंगीकर
उरण :
सरकारने उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांत एमएमआरडीएच्या माध्यमातून ‘केएससी नवं नगर’ या नावाने तिसरी महामुंबई वसविण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत कोणत्याही प्रकारे स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकार या परिसरातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावून तिसरी मुंबई हे विकसित शहर बसविण्याचा घाट घालत आहे. त्या प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यासाठी व आपल्या न्याय हक्कासाठी एमएमआरडीए केएससी नवंनगर विरोधी समितीची स्थापना करून या परिसरातील शेतकरी एकवटले आहेत. त्यांनी शनिवारी (दि. १८) लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री महागणपतीचे दर्शन घेऊन चिरनेर गावातील हुतात्म्यांच्या पावन भूमीतून सदर प्रकल्पाविरोधात आंदोलनाची हाक गाव बैठकीच्या माध्यमातून दिली आहे.

२००५ साली राज्यातील तत्कालीन सरकारने उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रिलायन्स एससीझेडच्या माध्यमातून महामुंबई प्रकल्प निर्माण करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. यावेळी माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील, क्राँ. विलास सोनावणे, माजी विरोधी पक्षनेते ॲड. दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन, न्यायालयीन लढाई लढत सरकारचे मनसुबे उधळून लावले होते. आज भाजपा महायुतीचे सरकार पुन्हा एकदा उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांत एमएमआरडीएच्या माध्यमातून ‘केएससी नवं नगर’ या नावाने तिसरी महामुंबई वसविण्याचा निर्णय घेत आहे. एकंदरीत कोणत्याही प्रकारे स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकार या परिसरातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावून तिसरी मुंबई हे विकसित शहर बसविण्याचा घाट घालत आहे.

त्यामुळे उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांतील घरे, गावे आणि शेतजमीनी संकटात येणार आहेत. त्याविरोधात माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमएमआरडीए केएससी नवं नगर विरोधी समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून सदर प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी गाव निहाय बैठकीचे आयोजन करण्याचा निर्धार समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केला. त्याची सुरुवात हुतात्म्यांच्या पावन झालेल्या चिरनेर भूमीतील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री महागणपतीचे दर्शन घेऊन तसेच हुतात्म्यांना अभिवादन करून एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थित शनिवारी (दि. १८) केली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरपंच भास्कर मोकल, कामगार नेते भुषण पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, मा. उपसभापती शुभांगी सुरेश पाटील, डॉ. सुभाष पाटील, ॲड. सत्यवान भगत, रुपेश पाटील, उपसरपंच दिपक पाटील, आजी माजी सरपंच, उपसरपंच यांच्यासह समितीचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!