प्रतिनिधी
नागोठणे : पीएम किसान योजनांसारख्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बनावट ॲप तयार करून काही शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा हॅकरने गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. नागोठणे व परिसरातील काही व्यक्तींना पीएम किसान योजनेसंबंधित मेसेज आला होता. शेतकऱ्यांसाठी हा उपयुक्त असल्याने हा मेसेज पाहून अनेकांनी तेथे दिलेल्या सूचनांनुसार ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर अनेकांचे मोबाईल हॅक झाल्याचा प्रकार घडला आहे. काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी हे ॲप ब्लॉक करण्यासाठी रिपोर्टही केल्याचे समोर आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मोबाइलवर बनावट ॲप लिंक पाठवली जाते आणि त्यावरून मोबाइलवर ताबा मिळवला जातो. ही पद्धत गेल्या सहा महिन्यांपासून व्हॉट्सअप ग्रुपवर हॅक झालेल्या मोबाइलच्या मदतीने हॅकर ग्रुप वर पाठवायला लागले आहेत. तुम्ही ज्या ग्रुपमध्ये असाल, तुम्ही ज्या समुदायाला जोडले गेले आहात, त्या अनुसार ग्रुप तयार केला जातो. मोबाइल धारकांच्या विविध ग्रुपला मेसेज पाठवून हे ॲप मोफत असून, माहितीस्तव आहे, असे मेसेज केले जातात. पीएम किसान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांसारख्या ग्रामीण भागातील लोकांना आकर्षित करणाऱ्या योजनांचे नाव त्या ॲपला दिले जाते. स्वाभाविकच योजनांना बळी पडणारे नागरिक तत्काळ हे ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करतात व आपल्या मोबाइलचा सर्व ताबा हॅकरच्या हातात देऊन टाकतात. त्यानंतर हॅकर एक तर त्यांना ब्लॅकमेल करतो किंवा मोबाइलच्या फोन पे, गुगल पे त्याचबरोबर नेट बँकिंगच्या वेगवेगळ्या ॲपवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करून बँक खाते रिकामी करून टाकतो.
नागोठणे व परिसरातील काही व्यक्तींना पीएम किसान योजनेसंबंधित मेसेज आला होता. शेतकऱ्यांसाठी हा उपयुक्त असल्याने त्यांनी हा मेसेज पाहून तेथे दिलेल्या सूचनानुसार ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर अनेकांचे मोबाइल हॅक होण्याचा प्रकार घडला. काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी हे ॲप ब्लॉक करण्यासाठी रिपोर्टही केल्याचे समोर आले आहे. तरी अशा प्रकारची कोणतीही लिंक आपल्या मोबाईलवर आली तर ती उघडून पाहू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
