रायगडच्या पालकमंत्री पदी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची वर्णी लागण्याची शक्यता?
मिलिंद माने
मुंबई : राज्यातील महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 36 जिल्ह्यातील पालकमंत्री, सह पालकमंत्री यांच्या नियुक्तीचे आदेश १८ जानेवारी रोजी काढल्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले समर्थकांनी मुंबई गोवा महामार्गावर जाळपोळ आंदोलन केल्यानंतर तूर्तास रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली असून रायगडच्या पालकमंत्री पदावर भाजपाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देखील मागील सरकारमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांना देखील सत्तेत सामावून घेत मंत्रिपदाचे वाटप करण्यात आले. मात्र खाते वाटपावरून शिंदे गटातील आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असताना मंत्र्यांच्या दालन वाटप व निवासस्थानावरून शिंदे गटातील मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातच १८ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील ३६ जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून शिंदे गटातील मंत्री नाराज होते. त्यातच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महाविकास आघाडी सरकारमधील असलेला जुना वाद पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये पाहण्यास मिळाला.
रायगडचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या महिला व बालविकास मंत्री तथा रायगड ३२ रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना मिळाल्याने मंत्री भरत गोगावले यांनी जाहीरपणे प्रसिद्धी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केल्याने गोगावले समर्थकांनी १८ जानेवारीच्या मध्यरात्री अकराच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड तालुक्यातील नडगाव गावाजवळ महामार्गावर टायर जाळून सुमारे दोन तास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखला. तर दुसरीकडे आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील रोहा, माणगाव, कोलाड या परिसरात तटकरे समर्थकांनी जल्लोष साजरा केला. यामुळे गोगावले समर्थक कमालीचे संतप्त झाले.
रोजगार हमी मंत्री गोगावले समर्थकांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदाच्या नियुक्तीमुळे दुसऱ्या दिवशी रविवारी १९ जानेवारी रोजी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे सत्र चालू केले. यामुळे रायगडमधील पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला जाणार याची कल्पना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आल्याने त्यांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला तातडीने निर्देश देऊन पुन्हा एकदा रायगडसह नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीस १९ जानेवारी रोजी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांच्या स्वाक्षरीने तात्काळ स्थगिती दिली.
रायगड पालकमंत्री पद वाद भाजपाच्या हितासाठी?
रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद हा कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता अधिक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यापैकी कोणालाही पालकमंत्री पद दिले तर वाद हा होणारच आहे. यापेक्षा दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या युक्तीने रायगडचे पालकमंत्री पद हे भाजपाकडे जाणार आहे.
राज्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाढता वाद भविष्यात सरकारला डोकेदुखी ठरणार असल्याने रायगडचे पालकमंत्री पद हे भाजपा आपल्याकडे ठेवणार असून पालकमंत्री पदाच्या नियुक्तीमध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री पद हे शिंदे गटाचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना देण्यात आले आहे. मात्र त्या ठिकाणी सह पालकमंत्री म्हणून भाजपाच्याच नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण या राज्यमंत्री म्हणून असलेल्या माधुरी मिसाळ यांना देण्यात आले आहे. याच माधुरी मिसाळ यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या सह पालकमंत्री पदावरून त्यांची बढती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेनेच्या शिंदे गट या वादाला तिलांजली देण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जाण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून येत असलेल्या माधुरी मिसाळ या प्रशासनात वाकबदार असून रायगडचे पालकमंत्री पद दिल्याने त्यांना पुणे व रायगड व मंत्रालय असा त्यांचा प्रवास सुकर होणार असल्याने व भाजपाला देखील ते सोयीस्कर असणारे असल्याने रायगडच्या पालकमंत्री पदावरून चाललेला वाद पाहता रायगडचे पालकमंत्री पद हे भाजपाकडेच यापुढे राहील यावरून स्पष्ट होत आहे.
